साधुग्राम हवा आहे, तपोवनही आम्हाला हवा आहे, पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

नाशिकच्या तपोवनमधील झाडांची कत्तल करण्याचं फर्मान सरकारने काढलं आहे. कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभं करायचं आहे आणि त्यासाठी झाडांचा खून करण्यासाठी सरकराने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहे. सरकारच्या या दडपशाहीविरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमी, पत्रकार, कलाकार सर्वच एकवटले आहेत. सरकारच्या या जुलमी निर्णयाला कडाडून विरोध केला जात आहे. आम्हाला साधुग्राम हवा आहे, तपोवनही आम्हाला हवा आहे, पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नको, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला. तपोवनमध्येच साधुग्राम का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, ” आज नागरिकांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. पण जी जागा आपण स्वच्छ करत आहोत, ती भाजपला अगदी ‘साफ’ करून टाकायची आहे. साधुग्राम तपोवमध्येच का? एक व्हिडीओ नाशिकच्या एका बिल्डरने काही दिवसांपूर्वी शेअर केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि असं सुचवलं गेलं की साधुग्राम करून ग्रीन झोनमधून यलो झोनमध्ये. म्हणजेच जंगलाला रेसिडेंशिअल झोन करता येईल. TDR वापरता येईल. तो व्हिडीओ आपण पाहिलात का? बिल्डर कोण आहे? नाशिकवर खरच प्रेम आहे का?.” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

हा साधूंचा नाही, तर TDT आणि खजिन्याचा खेळ तर नाही ना? असा सवाल करत ते पुढे म्हणाले की, “नाशिक महानगरपालिका जर यांच्या हाती गेली, तर नाशिक विकायला काढतील, हे तर स्पष्ट आहे. हा धर्माचा पडदा आहे. 700 झाडे स्थगितीनंतर कापणार, असं भाजपची बिल्डर-राजवट नाशिकला धमकावून सांगत आहे. साधुग्राम आम्हाला हवा आहे. तपोवन आम्हाला हवा आहे. पण भाजपच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही.” अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.