
दुबई पोलिसांच्या ताफ्यात आता फेरारी कार
दुबई पोलिसांच्या गाडय़ांच्या ताफ्यात आता फेरारी पुरोसांगुए मंसोरी एडिशन आली आहे. जगभरात कडक कायदा-सुव्यवस्थेसाठी दुबई पोलिसांची ओळख आहे. दुबई मॉल, बुर्ज खलिफाजवळ गस्त घालताना दुबई पोलीस फेरारीचा वापर करणार आहेत. दुबई पोलिसांच्या ताफ्यात याआधी महागडय़ा कारचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये लॅम्बर्गिनी एवेंटाडोर, मॅकलारेन आर्टुरा, ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी, टेस्ला साइबरट्रकसह अनेक महागडय़ा गाडय़ांचा समावेश आहे.
आसाममध्ये 11 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
आसाममध्ये सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत 11 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहा संशयित तस्करांना अटक करण्यात आली आहे. कार्बी आंगलोंग आणि काछार जिह्यात सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये याबा टॅबलेट आणि अन्य अवैध वस्तूंचा समावेश आहे. याबा टॅबलेटवर बंदी आहे.
चांदीच्या 17 लाख उत्पादनांवर हॉलमार्किंग
सोन्याच्या दागिन्याप्रमाणे चांदीच्या वस्तूंवरही हॉलमार्ंकगची सुविधा सुरू करण्यात आली आहे याला आता तीन महिने उलटले आहेत. या तीन महिन्यांत चांदीच्या 17.35 लाखांहून अधिक वस्तूंवर हॉलमार्ंकग करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. हॉलमार्ंकगची सुविधा 1 सप्टेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली होती. चांदीच्या दागिन्यांवर एचयूआयडी हॉलमार्ंकग शुद्धतेच्या आश्वासनाला मजबूत करणे आणि बनावट हॉलमार्ंकगला संपवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर रात्रभर गोळीबार
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर शुक्रवारी रात्रभर गोळीबार झाला. यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी तणावपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांच्या अधिकाऱयांनी गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी सैनिकांनी 20 चौक्या सोडून पलायन केल्याची माहिती आहे, तर पाकिस्तानी सैनिकांनी अफगाणिस्तानातील सामान्य
लोकांवर रॉकेटचा हल्ला केला.


























































