पनवेलच्या यादीत बेलापूर, ऐरोलीतील मतदार घुसडले; 12 हजार 143 दुबार नावे हटवा, शिवसेनेची पालिकेवर धडक

पनवेलच्या मतदार यादीत बेलापूर व ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे घुसडल्याचा आरोप शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे. या यादीत तब्बल १२ हजार १४३ दुबार नावे असून याविरोधात शिवसैनिकांनी पालिकेवर धडक देत या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवला. पालिका निवडणुकीपूर्वी ही नावे यादीतून रद्द करा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

संपूर्ण देशभरात बोगस मतदानाविरोधात विरोधकांनी रान उठवत निवडणक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी दुबार मतदारांची नावे यादीतून वगळावीत अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र असे असताना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली पाठोपाठ आता पनवेल महापालिका हद्दीतही १२ हजार १४३ दुबार मतदारांची नावे असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे ही नावे ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघातील असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

शहानिशा करून अंतिम यादी तयार करा
मतदार यादीतील घोळाविरोधात जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल पालिका आयुक्तांना निवेदन दिले असून या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. प्रारूप यादीवर हरकती घेण्याची अंतिम मुदत ३ डिसेंबर २०२५ रोजी असली तरी निवडणुका पारदर्शीपणे पार पडण्यासाठी या यादीची शहानिशा करून अंतिम मतदार यादी तयार करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पनवेल महापालिकेच्या मतदार यादीत बेलापूर विधानसभा क्षेत्रातील ६ हजार १३८ तर ऐरोली विधानसभा क्षेत्रातील ६००५ संशयित नावे घुसडली असल्याचा आरोप शिरीष घरत यांनी केला आहे.