भाजप आमदार बालदींच्या समर्थकांचा धुडगूस; वृद्धेला फरफटत नेत केली मारहाण

bjp logo flag

उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला म्हणून आमदार महेश बालदी यांच्या समर्थकांनी मायलेकाला फरफटत नेऊन मारहाण केली. यात मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील व त्यांच्या आई जखमी झाल्या असून या गुंडगिरीची तक्रार उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांनी उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला होता. याचा राग भाजप आमदार समर्थकांमध्ये धुमसत होता. सतीश पाटील आईसोबत घरी निघाले होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष कौशिक शहा व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी सतीश पाटील यांच्यासह त्यांच्या आईला दिवसाढवळ्या रस्त्यावरच घेरले. मायलेकाला बालदींच्या बंगल्यापर्यंत फरफटत नेऊन मारहाण केली. यावेळी त्यांनी डोक्यात दगड घालू अशी धमकी देत या मायलेकाला माफी मागायला लावली.