
उत्तर हिंदुस्थानात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तेथे थंडीची लाट आली आहे. जम्मू-कश्मीर आणि हमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होत असून ते थंडीने गोठले आहे. जम्मू कश्मीरसह पर्वतीय भागांत बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मैदानी भागांत थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तरेकडे थंडीची लाट असल्याने महाराष्ट्रात उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने राज्यालाही हुडहुडी भरणार आहे.
दिल्लीपासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातही या लाटेचा परिणाम दिसू लागला आहे. या सर्व राज्यांत सकाळी व सायंकाळच्या सुमारास दाट धुक्यांमुळे दृश्यमानता कमी झाली आहे. सरासरी तापमान ४ अंशांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. या राज्यांत तापमान २ ते ४ अंशांपर्यंत उतरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
7-8 डिसेंबरला, #विदर्भातील काही भागात #शीत_लहरींचा प्रभाव असण्याची शक्यता.
: आयएमडी@imdnagpur https://t.co/7RRv9SBwHr— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 6, 2025
आयएमडीनुसार ७ ते ११ डिसेंबरदरम्यान उत्तर भारतात थंडीच्या लाटेची शक्यता पाहता मध्य प्रदेश व विदर्भात तापमानात मोठी घट होऊ शकते. याच्या परिणामी महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. विशेषत: पश्चिम व मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशासह उत्तर हिंदुस्थानातील बहुतांश भागांत ७ व ८ डिसेंबर रोजी तापमानात घट होईल. सरासरीपेक्षा तापमान कमी होऊन धुक्याचे साम्राज्य असेल. यात दृष्यमानता अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

























































