
एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आपला दवाखाना योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपने आज विधान परिषदेत शिंदे गटावर निशाणा साधला. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटातील वाद समोर आला.
विधान परिषदेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. ठाण्यात एक आपला दवाखाना उघडला होता, पण तिथे गेलो तर तो बंद होता आणि तिथे साडीचे दुकान होते. ती दवाखान्याची जागा कोणाला भाडय़ाने दिली? असा प्रश्न डावखरेंनी उपस्थित केला. याप्रश्नी उडवाउडवीची उत्तरे देणाऱया अधिकाऱयांवर कारवाई झाली का? असा सवालदेखील त्यांनी केला. ही योजना गरीबांसाठी आहे, पण प्रत्यक्षात तिथे फक्त ब्लडप्रेशर-शुगर तपासतात आणि मग मोठय़ा हॉस्पिटलमध्ये पाठवतात. डॉक्टर-नर्सेस नसतात, फक्त टेक्निशियन असतात. फार्मासिस्ट तर कुठेच दिसत नाही. नर्सच औषधे देते याकडे इतर सदस्यांनी लक्ष वेधले.
चौकशी करू – आरोग्यमंत्री
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कर्मचारी आणि सुविधा वाढवण्याबाबत सूचना येतील तर त्या लगेच अमलात आणू, असेही आबिटकर म्हणाले.




























































