
शिवसेना आमदार अनिल परब आणि भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अनिल परब यांनी ‘भाडोत्री मंत्री’ असा शब्द वापरल्याने नितेश राणे यांना तो चांगलाच झोंबला. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
नगरविकास विभागाबाबतच्या मुद्दय़ावर उत्तर देण्यासाठी कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे किंवा नगरविकास राज्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यांची उत्तरे उद्योगमंत्री उदय सामंत देत होते. त्याला आक्षेप घेत परब यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला. सभागृहाच्या नियमाचे पालन होतेय की नाही हे बघणे सभापतींची जबाबदारी आहे. सभापती, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते ही सभागृहातील तीन महत्त्वाची पदे आहेत. पण त्या तीन पायांवर चालण्याऐवजी सरकार दोन पायांवर चालतेय का, असे अनिल परब म्हणाले.
त्यावर नितेश राणे यांनी उत्तर द्यायला आम्ही सभागृहात आहोत ना असे म्हटले. त्यावर ‘भाडोत्री मंत्र्यां’कडून उत्तरे ऐकायची का, असे परब म्हणाले. तो शब्द झोंबल्याने मागे घ्यावा अशी मागणी राणे यांनी केली. मग पर्यायी शब्द सांगा अशी मागणी अनिल परब यांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाल्याने सभापती राम शिंदे यांनी तो शब्दच कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनीही उद्योगमंत्रीच उत्तरे देत असतील तर सगळय़ा खात्याची उत्तरे देण्याची जबाबदारी एकाच मंत्र्यावर टाकावी, असे सांगितले.


























































