देवाभाऊ आम्हाला चॉकलेट नको, काम द्या

महायुती  सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या बहिणींच्या तरुण मुलांना काम देऊ अशी हमी देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनाही सुरू केली. तरुणांनी 11 महिन्यांचे प्रशिक्षणही घेतले. मात्र त्याला दोन वर्षे झाली. तरीही त्यांच्या हाताला ना काम आहे, ना रोजगार. त्यामुळे एकनाथ मामा आणि देवाभाऊ मामा, आम्हाला चॉकलेट नको, तर काम द्या, असा अनोखा आक्रोश करत तरुणांनी दणाणून सोडले.

रोजगाराची साथ द्या, भीक नको, संधी द्या अशी मागणी करत हजारो तरुणांनी अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी विधान भवनावर सहा मोर्चांनी धडक दिली. अख्ख्या अंगावर चॉकलेट बांधून आलेल्या तरुणांनी या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण स्टेडियमचे लक्षही वेधून घेतले. सोबतच तिथे उपस्थित काही पोलिसांनादेखील त्यांनी चॉकलेट वाटत थंडीत मिश्किली केली.

राज्यातल्या लातूर, नांदेड, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सांगलीतल्या ग्रामीण भागातील शेकडोंच्या संख्यने ताकद एकवटत नागपुरात दाखल झालेले आंदोलक सकाळी 11 च्या सुमारास मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ अधिवेशन स्थळी रवाना झाले. चॉकलेटच्या टोप्या घातलेले कार्यकर्ते आंदोलनाचे आकर्षण ठरले. हजारो तरुण-तरुणी या आंदोलनात सहभागी झाले. अनोख्या आंदोलनामागची भूमिका मांडताना बालाजी पाटील चाकूरकर म्हणाले, रोजगार मिळेल या आशेने 11 महिन्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना 2 वर्षांनंतरही हातात कटोरा घेऊन भीक मागण्याची वेळ आली आहे. आंदोलनात हभप तुकाराम महाराज, हरिभाऊ राठोड, अनुप चव्हाण, प्रकाश साबळे यांनी सहभाग नोंदवला.

तरुणांची थट्टा नको!

मायबाप सरकार काwशल्य प्रशिक्षणाचे नाव घेत आहे. मात्र सरकारनेच प्रशिक्षित केलेल्या तरुणांच्या हाताला काम हे सरकार देत नाही. रोजगाराचे चॉकलेट दाखवत सरकारने तरुणांची थट्टा सुरू केली असून ती थांबवा असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. लहान मूल रडल्यानंतर जसे त्याला चॉकलेटची लालूच दाखवली जाते तसेच सरकारने बेरोजगार  तरुणांना रोजगाराचे चॉकलेट दिले आहे. हे चॉकलेट त्यांना परत करण्यासाठी आम्हाला विधिमंडळात यावे लागले आहे असे आंदोलक म्हणाले.