
वाडा तालुक्यातील सनराईज कंपनीत भीषण स्फोट होऊन दोन कामगार ठार झाले, तर दोघे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जामघर-लखमापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या कंपनीत रविवारी रिअॅक्टरचा स्फोट झाला होता.
सनराईज ग्रीन इंडस्ट्रीज या कंपनीत जुने टायर जाळून प्रक्रिया करून त्यापासून ऑइल, तारा, पावडर काढून त्यांची विक्री केली जाते. या कंपनीत २० कामगार काम करीत होते. रविवारी सकाळी रिअॅक्टर स्फोटात सुनील मांझी (२८), गोलू बचन (२०) यांचा मृत्यू झाला. ते अनुक्रमे बिहार व उत्तर प्रदेशचे रहिवासी होते, तर दिनेश कुमार (४५) व अनिल पाशी (३१) हे कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तालुक्यात टायर कंपन्यांमध्ये वारंवार अपघात घडत आहेत. अनेक निरपराध कामगारांचा बळी जात असतानाही कोणत्याही कंपनीवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ कल्पेश पाटील यांनी केला.
कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर
वाडा तालुक्यातील लखमापूर येथील सनराईज कंपनीत व्यवस्थापकाकडून कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी कुठे घेतली जात नाही. याप्रकरणी कंपनी प्रशासनाला जबाबदार धरत कंपनी मालक, ठेकेदार, मशीन ऑपरेटर यांच्याविरोधात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































