स्त्री-लिपी – विश्लेषक, मर्मग्राही आणि बेधडक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

समाजात राजरोसपणे सुरू असणारं, स्त्रीच्या स्वातंत्र्याचा संपूर्ण संकोच करुन टाकणारं पुरुषसत्तेचं कारस्थान प्रथमच अगदी ठळकपणे उघडकीस आणणारे लेखन म्हणजे ताराबाई शिंदे यांचं `स्त्री-पुरुष तुलना’ हे निबंधरुपी पुस्तक. स्त्रीचं आत्मभान जागवत स्त्री जीवनाचा थेट विश्लेषक, मर्मग्राही आणि बेधडक चिकित्सक अभ्यास करणारे हे पुस्तक इ.स. 1882 मध्ये प्रकाशित झाले आहे.

मागच्या लेखात आपण पाहिलं की ताराबाई शिंदे (1850-1910) यांचं `स्त्री-पुरुष तुलना’ हे निबंधरुपी पुस्तक इ.स. 1882 मध्ये प्रकाशित झालं. ताराबाईंचं हे लेखन मराठी गद्याचा लखलखीत नमुना तर आहेच, मात्र त्यातून व्यक्त झालेले विचार समाजाचे डोळे खाड्कन उघडणारे आहेत. स्त्राr जीवनाचा इतका थेट विश्लेषक, मर्मग्राही आणि बेधडक चिकित्सक अभ्यास यापूर्वी निदान मराठीत तरी कुणी केल्याचं सापडलं नाही. स्त्राrनं तर नाहीच. निबंधाचं शीर्षकच पहा- स्त्राr-पुरुष तुलना! असा विषय मनात येणं, त्यावर लिहावसं वाटणं आणि ते तितक्याच तळमळीन आणि तर्कशुद्ध रीतीनं मांडणं…सारेच अद्भुत आहे!

या लेखनाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. सुरतेजवळ उलपाड या गावच्या विजयालक्ष्मी नावाच्या चोवीस वर्षांच्या ब्राह्मण विधवेवर भृणहत्या केल्याचा आरोप ठेवून तिला मॅजिस्ट्रेटपुढे उभं करण्यात आलं. आपण मुलाला जन्म दिल्याचं आणि लज्जाभयास्तव मुलाचा जीव घेऊन ते बालक मोलकरणीकरवी कचराकुंडीत टाकून दिल्याचं तिनं कबूल केलं. या खटल्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. विजयालक्ष्मीच्या बाजूनं आणि तिच्या विरोधी दोन्ही प्रकारच्या मतांचा गलबला झाला. ही काही अपवादात्मक परिस्थिती नव्हती. अशा अनेक दुर्दैवी विधवा त्या काळात होत्या. अशा प्रकारच्या घटनेत फक्त स्त्राrला बदनाम करण्याची समाजाची दृष्टी पाहून ताराबाई अतिशय अस्वस्थ झाल्या आणि अत्यंत प्रक्षोभक शब्दांत त्यांनी स्त्रियांची ही कैफियत मांडली.

आपल्या या लेखनाची सुरुवात ताराबाई (त्यांच्याच मूळ शब्दात) कशी करतात पाहा, “…हा लहानसा निबंध मी माझ्या देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहे.” अवघ्या स्त्रिया आपल्या `भगिनी’ आहेत, ही मोलाची जाणीव ताराबाई व्यक्त करतात. या निबंधामधून त्यांनी स्त्राrचं आत्मभान जागवलं आहे आणि ते करताना व्यापक सामूहिकता विचारात घेतली आहे म्हणून त्या अगदी निसंदिग्ध शब्दांत म्हणतात, “यात अमुकच जाती किंवा कुळ यांकडे माझे मुळीच लक्ष नाही.” एकोणिसावं शतक संपण्यापूर्वीच बुलढाण्यासारख्या आडबाजूच्या गावातल्या स्त्रीनं हे म्हणावं आणि त्यासाठी हेतूत `निबंध’ हा विचारनिष्ठ आकृतिबंध निवडावा, याचं विलक्षण कौतुक तर वाटतंच, पण त्याहून अधिक दाद त्यांच्या प्रगल्भ विचारशीलतेला, प्रश्न उपस्थित करणाऱया त्यांच्या चिकित्सकतेला द्यावीशी वाटते.

ताराबाई स्त्राrकडे माणूस म्हणून पाहत होत्या. पुरुषांना एक नियम आणि स्त्रियांना मात्र दुसराच ही `दुटप्पी मूल्यव्यवस्था’ असे शब्द जरी ताराबाईंनी वापरले नसले तरी त्यांना त्याची प्रखर जाणीव होती. त्या लिहितात, जर बायकोला नवराच देव, तर नवऱयाची वागणूकदेखील देवाप्रमाणेच पाहिजे. बायकांनी भक्ताप्रमाणे जशी भक्ती करावी तशी नवऱयानेदेखील त्यांजवर देवाप्रमाणेच ममता करून त्यांचे सुख-दुःख जाणावे की नाही? घरकामाला मोल हवं, हा जो नारा नंतर स्त्राrचळवळीने दिला, त्याचंही बीज ताराबाईंच्या लेखनात सापडतं. “एकदाच हजार-बाराशे खर्चून ही एक सत्तेचीच बटीक विकत घेतली असे तुम्हास वाटू लागते” किंवा “स्त्रियांना एक शब्द बोलण्याची, अगर चिमटीभर दाण्याची सत्ता नसावी काय रे?” ही त्यांची वाक्यं पुरेशी बोलकी आहेत.

ताराबाईंनी आपल्या या निबंधात देव आणि धर्म यांचीही चिकित्सा निर्भयपणे केलेली आहे. पुराणे, रामायण, महाभारत, पांडवप्रताप, रामविजय हे ग्रंथ बऱयाच अंशी स्त्राrस्वातंत्र्यविरोधी आहेत, प्राधान्याने पुरुषानुकूल आहेत, असं त्या ठणकावून सांगतात. ही मांडणी फक्त धीटच नाही, ती तर्कसुसंगत आहे, परखड आहे आणि तिच्यामागे खरीखरी तळमळ आहे, सात्विक संताप आहे. ताराबाईंच्या या लेखनामुळे काय साधलं? तर समाजात राजरोसपणे रूढ असणारं, स्त्राrच्या स्वातंत्र्याचा संपूर्ण संकोच करून टाकणारं पुरुषसत्तेचं कारस्थान प्रथमच अगदी ठळकपणे उघडकीस आलं! स्त्राr चळवळींचे बायबल म्हणावे असा हा समृद्ध वैचारिक ठेवा आहे. समाजात स्त्राr-पुरुषांत असमतोल आहे हे जाणवणे, त्यावर स्वतचे चिंतन करून त्याला निरीक्षणे, वाचन यांची जोड देत तर्कशुद्ध युक्तिवाद करत लेखन करणे, हे सारे अचंबित करणारे आहे. आज अनेक क्षेत्रांत वावरणाऱया आत्मविश्वासपूर्ण स्त्रिया पाहत ताराबाईंचा युक्तिवाद फळाला आला, हेच सांगत आहेत.

(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.) [email protected]