
अहिल्यानगर शहरातील महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. कधीकाळी शहरात महापालिकेच्या 17 शाळा कार्यरत होत्या; आज केवळ 11 शाळाच सुरू आहेत. अशी माहिती अधिकार अंतर्गत प्राप्त माहितीनुसार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत या 11 शाळांमधील एकूण विद्यार्थी संख्या फक्त 788 इतकी आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी असून, मनपा शाळांच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
भुतकरवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालयात 36 विद्यार्थी, भोसले आखाडा येथील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्र. 16 मध्ये केवळ 13 विद्यार्थी, तर सर्जेपुरा येथील महानगरपालिका शाळा 13 मध्ये 33 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केडगाव येथील मनपा शाळा, आदर्शनगर येथे 39 विद्यार्थी तसेच सर्जेपुरा येथील अहिल्याबाई होळकर महानगरपालिका शाळा क्र. 11 मध्ये 33 विद्यार्थी इतकीच पटसंख्या नोंदवली गेली आहे.
सावेडी येथील महात्मा जोतिबा फुले प्राथमिक विद्यालयात 118 विद्यार्थी, रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात 172 विद्यार्थी, तर गांधीनगर, बोल्हेगाव येथील मनपा प्राथमिक शाळेत 183 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय झारेकर गल्ली येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय (निरीक्षणगृह व बालगृह
कॅम्पस) येथे 45 विद्यार्थी, केडगाव येथील महानगरपालिका प्राथमिक शाळा, ओंकारनगर येथे 77 विद्यार्थी तसेच अयोध्यानगर, केडगाव, रेल्वे स्टेशन परिसरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्राथमिक शाळेत 39 विद्यार्थी आहेत.
शहरातील महापालिकेच्या 11 शाळांची मिळून एकूण विद्यार्थी संख्या केवळ 788 इतकी असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत ‘सरकारी शाळा वाचवा’ आणि ‘मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषदेचे (अभियान) मुख्य संयोजक सुदाम लगड यांनी व्यक्त केले. मनपा शाळा या कधीकाळी शहराच्या शैक्षणिक वैभवाचे प्रतीक होत्या. याच शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक व उद्योजक घडले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.
आज एकत्र येऊन प्रयत्नांची गरज
– या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शहराचे लोकप्रतिनिधी, मनपा प्रशासन, शिक्षक, पालक आणि नागरिक यांनी एकत्र येऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण, स्वच्छ व सुरक्षित शालेय वातावरण, याकडे विशेष लक्ष दिल्यास मनपा शाळांवरील विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो. मनपा शाळा कशा सुधारतील आणि त्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय योगदान देता येईल, याचा विचार आजच करण्याची गरज असल्याचे आवाहन सुदाम लगड यांनी केले.





























































