
बँकांच्या कर्जापेक्षाही सावकारी कर्जामुळेच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. त्यामुळेच स्वर्गीय आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ‘‘शेतकऱ्यांना नडणाऱ्या सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू’’, असा सज्जड दम दिला होता. मात्र गृहखात्याचा हा वचक आता कमी झाला आहे. ग्रामीण भागांत सावकारांची दहशत व त्यांची चक्रवाढ पद्धतीने व्याज वसुली पुन्हा एकदा बोकाळली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या सावकारांनी रोशन कुडे या शेतकऱ्याला व्याजासाठी किडनी विकायला लावली. एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर नेऊन लूट करणे हा लुच्चेगिरीचा कळस आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला लागलेला हा कलंक आहे. व्याजासाठी शेतकऱ्याची किडनी गेली म्हणजे महाराष्ट्राचीच अब्रू गेली. ‘खोकेशाही’त रमलेल्या राज्य सरकारला याची लाज वाटत नाही काय?
केंद्रातील मोदी सरकार कायम ‘पाच ट्रिलियन इकॉनॉमी’चे फुगे हवेत सोडत असते. मात्र या फुग्यांतील हवा काढून घेणारी व मन सुन्न करणारी बातमी महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला भाग पाडण्यात आले व हा अमानुष प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या भागातून येतात, त्या विदर्भातील आहे. रोशन सदाशिव कुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात रोशन यांची चार एकर जमीन आहे. या शेतीवरच संपूर्ण कुटुंबाची गुजराण होते. काही वर्षांपूर्वी त्याने ब्रह्मपुरी येथील सावकारांकडून अवघे एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र कितीही व्याज फेडले तरी मुद्दल काही केल्या कमी होईना. एक लाखाचे कर्ज वाढून किती व्हावे? काही हजारांचे व्याज पकडले आणि वेळेत कर्जफेड झाली नाही तरी एक लाखाचे कर्ज फार फार तर दोन लाख, तीन लाख! पण पैशांपुढे मदांध झालेल्या सावकारांनी या गरीब शेतकऱ्याला राक्षसी चक्रवाढ व्याज लावले आणि एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर नेऊन ठेवले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरत नसल्याने रोशन कुडे यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी म्हणून दोन गायी घेतल्या. त्यासाठी त्या सावकारांकडून त्यांनी 50-50 हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र रोशन यांचे दुर्दैव असे की, या दोन्ही गायी अल्पावधीतच मरण पावल्या. शेतातून उत्पन्न नाही आणि गायींच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचा मात्र डोंगर झाला. सावकार व त्यांची माणसे वारंवार घरी येऊन वाटेल ते बोलू लागली. कुटुंबासमोर सततचा अपमान सहन करण्यापलीकडे गेला तेव्हा या शेतकऱ्याने चारपैकी दोन एकर शेत विकले आणि सावकारांच्या व्याजाची भरती केली, पण सावकारांची भूक काही थांबेना. ट्रॅक्टरसह
घरातील किडुक-मिडुक
जे काही होते, ते सारे विकून पैसे दिले तरी सावकारांनी व्याजाचा वरवंटा थांबवला नाही. एक लाखावर दिवसाला 10 हजार रुपये असे भयंकर व्याज उकळण्याचा सपाटा सावकारांनी सुरूच ठेवला होता. लाखो रुपये या शेतकऱ्याकडून उकळले तरी सावकारांचे समाधान होत नव्हते. आपल्या दमदाटीला घाबरून हा शेतकरी वाटेल तेवढे व्याज भरतोय हे पाहून सावकारांच्या अंगात अक्षरशः सैतान संचारला व एका सावकाराने त्याला किडनी विकून कर्ज फेडण्याचा सल्ला दिला. सावकारांच्या दहशतीमुळे हा शेतकरी किडनी विकायला तयार झाला. एका एजंटामार्फत या शेतकऱ्याला आधी कोलकाता येथे नेण्यात आले, तिथे तपासण्या करून नंतर देशाबाहेर नेत कंबोडिया येथे शस्त्रक्रिया करून त्याची किडनी काढण्यात आली. ही किडनी 8 लाख रुपयांना विकून सावकारांना दिले तरी सावकारांकडून पैशांसाठी तगादा सुरूच राहिला. शेती गेली, किडनी गेली, घरातील वस्तू विकून झाल्या तरी सावकारांनी टाकलेला व्याजाचा विळखा काही सुटेना. कर्ज आणि व्याजाचा फास सोडायला सावकार तयार नव्हते. तेव्हा ‘‘आता मंत्रालयात कुटुंबासह आत्मदहन करून मोकळा होतो. तरच माझ्या मागचा कर्जाचा हा ससेमिरा थांबेल,’’ असे हताश उद्गार आता या शेतकऱ्याने काढले आहेत. यापूर्वी पोलिसांकडे जाऊनही न्याय मिळाला नाही. मात्र किडनी गेल्यानंतर चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल घेतली आणि किशोर बावनकुळे, लक्ष्मण उरकुडे, रामभाऊ बावनकुळे व संजय बल्लारपुरे या चार सावकारांना पोलिसांनी अटक केली. एका गरीब शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली, पण पोलीस वेळीच जागे झाले असते व ‘भाईगिरी’ करणाऱ्या बावनकुळे नामक
सावकाराच्या मुसक्या
वेळीच आवळल्या असत्या तर रोशन कुडे या शेतकऱ्याची किडनी वाचली असती. कर्ज आणि व्याजाच्या ओझ्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. आज देशभरातील शेतकऱ्यांवर 12 लाख कोटींचे, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर तब्बल 8 लाख 38 हजार कोटींचे कर्ज आहे. कर्जफेडीचा तगादा सुरू झाला की, शेतकऱ्यांना नैराश्य येते आणि गळफास घेऊन वा विषारी औषध प्राशन करून ते मृत्यूला कवटाळतात. मात्र उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्जे माफ करणारे केंद्रीय सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन या संकटातून बाहेर काढत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते, पण सत्ता मिळाल्यावर मात्र मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांवर बँकांची कर्जे तर आहेतच; पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांभोवती सर्वात मोठा विळखा आहे तो सावकारांचा. बँकांच्या कर्जापेक्षाही सावकारी कर्जामुळेच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. त्यामुळेच स्वर्गीय आर.आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी ‘‘शेतकऱ्यांना नडणाऱ्या सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू,’’ असा सज्जड दम दिला होता. मात्र गृहखात्याचा हा वचक आता कमी झाला आहे. ग्रामीण भागांत सावकारांची दहशत व त्यांची चक्रवाढ पद्धतीने व्याज वसुली पुन्हा एकदा बोकाळली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या सावकारांनी रोशन कुडे या शेतकऱ्याला व्याजासाठी किडनी विकायला लावली. एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर नेऊन लूट करणे हा लुच्चेगिरीचा कळस आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला लागलेला हा कलंक आहे. व्याजासाठी शेतकऱ्याची किडनी गेली म्हणजे महाराष्ट्राचीच अबू गेली. ‘खोकेशाही’त रमलेल्या राज्य सरकारला याची लाज वाटत नाही काय?




























































