सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे आज पुन्हा आंदोलन, सीएसएमटीतील डीआरएम कार्यालयासमोर निदर्शने करणार

central railway mazdoor sangh protest

गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आंदोलन करणाऱया सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे गुरुवारी पुन्हा डीआरएम कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ट्रक मॅनेजर, पीडब्ल्यूआय आणि आयओडब्ल्यू कर्मचाऱयांना वरिष्ठ पातळीवरून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या निषेधार्थ हे निदर्शने केली जाणार आहेत. इंजिनीअरिंग विभागाच्या विविध समस्यांकडे आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱयांना वरिष्ठ पातळीवरून दिला जाणारा त्रास वारंवार वादाचा मुद्दा बनला आहे.

प्रशासन वेगवेगळय़ा कारणाने कर्मचाऱयांवर दडपशाही करीत असल्यामुळे असंतोष वाढला आहे. याचदरम्यान सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने कर्मचाऱयांवरील अन्याय रोखण्याच्या हेतूने पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. गुरुवार, 18 डिसेंबरला सायंकाळी 4.30 वाजता सीएसएमटी येथील मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील कर्मचारी सामील होणार आहेत. अमानुष पद्धतीने घेतली जाणारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, कामाचा अतिरिक्त ताण, जिवाला घातक ठरणारी कामाची पद्धत अशा विविध मुद्दय़ांवर रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. संघटनेने कर्मचाऱयांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. संघटनेतर्फे यापूर्वी गेल्या महिन्यात 9 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाली होती.