कंत्राटी महिला कर्मचारीला प्रसूती रजेचा आर्थिक लाभ द्यावाच लागेल. तांत्रिक मुद्दय़ांची सबब खपवून घेतली जाणार नाही, असे उच्च न्यायालयाने ठणकावले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, एका महिला डॉक्टरला हा लाभ नाकारण्यात आला होता. ही महिला डॉक्टर राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत आहे. सेवेचे 120 दिवस पूर्ण झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांचा तांत्रिक ब्रेक दिला जातो. त्यामुळे या महिला डॉक्टरला प्रसूती रजेचा आर्थिक लाभ देता येणार नाही, असा दावा प्रशासनाने केला होता. न्या. मकरंद कर्णिक व न्या. अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने त्यावर संताप व्यक्त केला. नियमानुसार कंत्राटी महिलेला प्रसूती रजेचा लाभ देणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.




























































