
मुंबई ः फायलींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी तसेच कामात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाने ई ऑफिस सेवा सुरू केली. मात्र, ऐन कार्यालयीन वेळेत वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे ई ऑफिस आता म्हाडा कर्मचाऱयांसाठी डोकेदुखी ठरतेय. अनेक कर्मचाऱयांना उशिरापर्यंत थांबून काम पूर्ण करावे लागत आहे.
गतवर्षी जानेवारीपासून म्हाडाने मुख्यालयात ई-ऑफिस सेवा सुरू केली. त्यामुळे एका टेबलावरून दुसऱया टेबलावर फाईल घेऊन जाण्याचे प्रकार बंद झाले असून डिजिटली फाईल हाताळली जात आहे. ई ऑफिसमुळे फाईल कोणत्या अधिकाऱयाकडे किंवा विभागात आहे, किती दिवसांपासून काम प्रलंबित आहे हे कळण्यास मदत होते. देशातील सर्व सरकारी कार्यालयांना व्यवस्थापन आणि टेक्नोलॉजी सोल्यूशन्स प्रदान करणाऱया नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमार्फत ही सेवा पुरवली जात आहे. मात्र, एनआयसीचे सर्व्हर अनेकदा डाऊन असते. या महिन्यात वारंवार सर्व्हर डाऊनचे प्रकार घडले. त्यामुळे कर्मचारी कार्यालयीन वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून प्रलंबित कामे पूर्ण करत आहेत.




























































