
स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख आणि पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या सुकन्या श्रीमती धनश्रीदीदी तळवलकर यांना प्रतिष्ठित सरदार पटेल विद्यापीठाने मानद ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (डि.लिट्.) पदवीने सन्मानित केले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सन्मान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनी, १५ डिसेंबर रोजी गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील वल्लभ विद्यानगर येथे विद्यापीठाचा दीक्षांत समारोह पार पडला. या सोहळ्यात गुजरातचे राज्यपाल माननीय आचार्य देवव्रत यांच्या हस्ते धनश्रीदीदींना ही पदवी प्रदान करण्यात आली. कोणत्याही पुरस्काराची किंवा सन्मानाची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा एका सुप्रतिष्ठित विद्यापीठाने गौरव केल्यामुळे जगभरातील स्वाध्याय परिवारात आनंदाचे वातावरण आहे.
गीतेच्या शिकवणीवर प्रवाही व्याख्यान पदवी प्रदान सोहळ्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) च्या निमंत्रणावरून धनश्रीदीदींचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘आयुष्य सुंदर करण्यासाठी गीतेची शिकवण’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रवाही शैलीत केलेल्या संवादाने त्यांनी NDDB चे अधिकारी, कर्मचारी आणि स्वाध्याय परिवारातील सदस्यांना मंत्रमुग्ध केले.
दीदींना मिळालेला हा सन्मान महाराष्ट्र आणि वैश्विक स्वाध्याय परिवारासाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.





























































