
अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचेही पुणे आणि सातारा हे जिल्हे शेजारी शेजारी आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत ड्रग्ज माफिया, जमीन माफिया, गँगवॉर, महिलांवरील अत्याचारांसारख्या गुन्ह्यांनी थैमान घातले आहे. फडणवीस त्यावर मौन बाळगून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे पाब्लो एस्कोबार आहेत का? असा प्रश्न काँगेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. ड्रग्जच्या व्यापारातून सत्ता, पैसा मिळवून अय्याशी करणारा, त्याच ड्रग्जच्या पैशांतून राजकारण करणारा पाब्लो हा जगातला सगळ्यात मोठा ड्रग्ज माफिया होता. तूर्त इतकेच!
एकनाथ शिंदे भ्रष्टाचाराच्या पैशांतून राजकारण करीत आहेत, निवडणुका लढत आहेत. आमदार-नगरसेवक विकत घेत आहेत हे सत्य आहे, पण या सगळ्यात ‘ड्रग्ज’ म्हणजे अमली पदार्थांच्या व्यवहारातून मिळालेला पैसाही गुंतला आहे काय? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात नशा आणि अमली पदार्थांच्या विळख्यात सापडला आहे. जागोजाग अमली पदार्थांचे साठे सापडत आहेत, पण आठ दिवसांपूर्वी साताऱ्यातील सावरी गावातील एका शेडमध्ये पोलिसांनी किमान दीडशे कोटींचे कोकेन जप्त केले. त्यापाठोपाठ साताऱ्यातील पाचगणीत 75 कोटींचे कोकेन जप्त केले. जणू सातारा ही कोकेनची राजधानीच झाली. साताऱ्याच्या सावरी गावात जे दीडशे कोटींचे कोकेन जप्त केले ती जागा उपमुख्यमंत्री व अमित शहांचे महाराष्ट्रातील एजंट शिंदे यांच्या भावाची आहे. शेडच्या बाजूला ‘तेजयश’ रिसॉर्ट आहे. ते प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. महिन्यातून किमान पाच-दहा वेळा उपमुख्यमंत्री शिंदे-मिंधे यांचे हेलिकॉप्टर सावरीजवळच्या दरे गावात उतरते. मिंधे इथे येऊन शेती करतात व त्या शेतीतून त्यांना उत्पन्न मिळते असे सांगितले जाते. शिंदे यांना शेतीतून इतके उत्पन्न मिळत असेल तर महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची आणि किडनी विकून सावकारांचे कर्ज फेडण्याची वेळ का यावी? त्यामुळे शिंदे व त्यांचे कुटुंब कोणती शेती करतात हे आता उघड झाले आहे. कोकेनचा कारखाना शिंदे कुटुंबाच्या परसात सापडला. जगाच्या बाजारात कोकेनला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे. आपल्या दरे-सावरी गावात इतक्या वर्षांपासून अमली पदार्थांचा उद्योग बहरला आहे हे राज्याचे मुख्यमंत्रीपद उबवलेल्या सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांना माहीत नसेल तर ते एक नंबरचे ‘माठ’ आहेत. पंजाबसारखे राज्य पूर्णपणे नशेच्या आहारी गेले तेव्हा त्यास ‘उडता पंजाब’ म्हटले गेले. गुजरातच्या मुंद्रा बंदरातून साडेतीन लाख कोटींची अमली पदार्थांची खेप पकडली गेली तेव्हा
देशाला हादरा
बसला. अफगाणिस्तानमार्गे अमली पदार्थांची खेप गुजरातच्या मुंद्रा बंदरावर सहीसलामत येते व तेथून महाराष्ट्रासह देशभरात त्याचे वितरण होते. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे व इतर जिल्ह्यांतही ‘ड्रग्ज’च्या विरोधात पालकांनी मोर्चे काढले. नाशिकसह इतर ठिकाणी ‘ड्रग्ज’ बनवणारे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. तरीही महाराष्ट्रातील शाळा, कॉलेज परिसरात मुबलक अमली पदार्थ मिळत आहेत आणि तरुण पिढी त्यात वाया जात आहे. कारण मंत्र्यांच्या कृपाछत्राखाली नशेचे कारखाने पुणे व साताऱ्यात बिनबोभाट सुरू आहेत. सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांना वाचवण्याचे काम मंत्रालयातून झाले. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना वारंवार फोन गेले. प्रकाश शिंदेंचे नाव एफआयआरमध्ये येऊ नये यासाठी दबाव आणला गेला. मुंढवा जमीन घोटाळ्यातही याच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव ‘पार्थ’ यांना सहीसलामत बाहेर काढले गेले. कायद्याचा एक ओरखडाही पार्थच्या अंगावर उठू दिला नाही व आता ‘ड्रग्ज’ प्रकरणात फडणवीस यांच्या गृहखात्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भावाला वाचवले आहे. महाराष्ट्राला ड्रग्जच्या विळख्यात लोटणाऱ्या या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे वाचाळ मंडळ गप्प का आहे? एरवी मिंधे गटाचे प्रवत्ते ऊठसूट बोलतात, पण उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या ड्रग्ज प्रकरणात तेच ‘ड्रग्ज’ चाटून हे सर्व लोक निपचित पडले आहेत. साताऱ्यातील ड्रग्ज कारखान्यात काम करण्यासाठी प. बंगालातील 50-60 कामगार आणले होते. हे लोक बांगलादेशी घुसखोर असल्याचा संशय आहे. हे खरे असेल तर ‘मिंधे’ यांनी हिंदुत्वाची चांगलीच सेवा चालवली आहे असे म्हणता येईल व त्याबद्दल ‘मालक’ अमित शहा यांनी मिंध्यांना ‘हिंदू ड्रग्जभूषण’ असा किताब देऊन सन्मान करायला हवा. या प्रकरणात अजित पवार पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी विशाल मोरे याला अटक करण्यात आली आहे. आणखी एक संशयित आरोपी ओंकार दिघे व प्रकाश शिंदे यांचे घनिष्ठ संबंध आहेत. या ड्रग्ज फॅक्टरीची
सर्व सूत्रे
प्रकाश शिंदे यांच्या ‘तेजयश’ हॉटेलमधून चालवली जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले तेव्हा श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत तपास अधिकारी आत्माजी सावंत यांना धमकावण्यात आले व प्रकाश शिंदे यांना वाचवले गेले. प्रकाश शिंदे, ओंकार दिघे आणि विशाल मोरे हे तिघे मिळून सावरी गावात ‘ड्रग्ज रॅकेट’ चालवत होते. त्याचे लागेबांधे मुंबई-पुण्यापर्यंत पसरले तेव्हा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने साताऱ्यात जाऊन कारवाई केली. सातारचे पोलीस अधीक्षक तोपर्यंत मिंध्यांच्या चाकरीत गुंग होते. मुंबई पोलीस सातारच्या कारवाईतून मागे फिरायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना तेथे पाठवून मूळ तपासात अडथळे आणले गेले. हे तेच तुषार दोषी आहेत, ज्यांनी जालना एसपी असताना अंतरवाली येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार करून महाराष्ट्र पेटवला होता. त्याचे ‘इनाम’ म्हणून तुषार दोशींना ‘सातार’चा खास पदभार दिला. त्यांच्या नाकासमोर ‘ड्रग्ज’चा कारखाना सुरू होता. मिंधे यांच्या गावात शेकडो वेळा पोलीस अधीक्षक व त्यांचा पोलीस ताफा गेला आहे, पण शिंदे यांच्या शेतमळ्यातला ‘ड्रग्ज’ बनवण्याचा कारखाना पोलिसांना दिसला नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचेही पुणे आणि सातारा हे जिल्हे शेजारी शेजारी आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत ड्रग्ज माफिया, जमीन माफिया, गँगवॉर, महिलांवरील अत्याचारांसारख्या गुह्यांनी थैमान घातले आहे. फडणवीस त्यावर मौन बाळगून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे पाब्लो एस्कोबार आहेत का? असा प्रश्न काँगेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. ड्रग्जच्या व्यापारातून सत्ता, पैसा मिळवून अय्याशी करणारा, त्याच ड्रग्जच्या पैशांतून राजकारण करणारा पाब्लो हा जगातला सगळ्यात मोठा ड्रग्ज माफिया होता. तूर्त इतकेच!
































































