
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हिंदुस्थानी रुपयाची प्रचंड झालेल्या घसरणीमुळे नव्या वर्षात स्मार्ट टीव्हीच्या किमती महाग होणार आहेत. रुपयामध्ये झालेली घसरण आणि मेमरी चीपच्या वाढलेल्या किमती या दोन प्रमुख कारणांमुळे टीव्हीच्या किमती 3 ते 4 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. एलईडी टीव्हीसाठी ओपन सेल, सेमीकंडक्टर चीप आणि मदरबोर्ड मोठय़ा प्रमाणात आयात करावे लागतात. रुपयाने नव्वदी ओलांडल्याने या किमती आता महाग होणार आहेत.
जागतिक स्तरावर मेमरी चीपचे संकट ओढावलेले आहे. एआय सर्व्हरसाठी हाय बँडविड्थ मेमरीची मोठी मागणी आहे. त्यामुळे डीआरएएम आणि फ्लॅश मेमरीच्या किमतीत वाढ झाली आहे. चीप मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या जास्त नफा मिळणाऱया एआय चीप्सवर फोकस करत आहेत.





























































