IND vs SA T20 – पंड्या-तिलकचं वादळ, वरुणचा विकेटचा चौकार; वन डेनंतर टी-20 मालिकाही टीम इंडियाच्या खिशात

अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या टी-20 लढतीत हिंदुस्थानने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. कसोटी मालिका गमावल्यानंतर हिंदुस्थानने वन डे आणि टी-20 मालिका खिशात घातली. हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह हे हिंदुस्थानच्या विजयाचे नायक ठरले.

प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 20 षटकात 5 बाद 231 धावांचा डोंगर उभारला. हार्दिक पंड्याने 25 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा कुटल्या. त्याला तिलक वर्मा यानेही 42 चेंडूत 73 धावा करत उत्तम साथ दिली. तत्पूर्वी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने हिंदुस्थानला अर्धशतकीय सलामी दिली. अभिषेक 37, तर संजू 34 धावा काढून बाद झाला.

हिंदुस्थानने विजयासाठी दिलेल्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेनेही दणदणीत सुरुवात केली. रिझा हेन्ड्रिक्स आणि क्विंटन डी कॉकने 69 धावांची सलामी दिली. वरुण चक्रवर्तीने हेन्ड्रिक्सला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हिस आणि डी कॉकने चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकेला 10 षटकात 120 धावांपर्यंत पोहोचवले. अखेर जसप्रीत बुमराहने डी कॉकला स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेत बाद केले आणि त्यानंतर वरुण चक्रवर्तीने इतर फलंदाजांनी फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

आफ्रिकेचा संघ 20 षटकात 8 बाद 201 धावांपर्यंत पोहोचू शकला. हिंदुस्थानने 30 धावांनी विजय मिळवत मालिकेवरही मोहोर उमटवली. हिंदुस्थानकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने 4 षटकात फक्त 17 धावा देत 2 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याला एक विकेट मिळाली. हार्दिकला अष्टपैलू कामगिरीबद्दल प्लेअर ऑफ द मॅच आणि मालिकेत 10 विकेट्स घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.