पुराणिक स्मृती महिला क्रिकेट – दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने मारली बाजी

प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने बलाढय़ भामा क्रिकेट क्लबचा 18 धावांनी पराभव करत बाजी मारली.

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत वेंगसरकर फाऊंडेशनच्या 3 बाद 15 धावा अशा ढासळलेल्या डावानंतर अष्टपैलू पूनम राऊत (नाबाद 97) व मंजिरी गावडे (नाबाद 58) यांनी चौथ्या विकेटसाठी 156 धावांची अभेद्य भागी केली आणि संघाला सावरले. हीच भागी वेंगसरकर संघाला जेतेपद मिळवून देणारी ठरली.

अत्यंत चुरशीच्या लढतीत 171 धावांचा पाठलाग करताना भामा क्लबला कुणीही मोठी भागी रचून देऊ शकला नाही. पाचव्या विकेटसाठी अंजू सिंग (40) व कृतिका कृष्णकुमार (33) यांनी पाचव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, पण त्यांच्या संघाला 20 षटकांत 8 बाद 153 धावांपर्यंतच मजल मारता आली. वेंगसरकरकडून अदिती सुर्वे, रेश्मा नायक, फातिमा जाफर, पूनम राऊत यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला.

वेंगसरकर फाऊंडेशनला अजिंक्यपद मिळवून देणारी पूनम राऊत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली तर वृषाली भगत उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज अदिती सुर्वे ठरले. उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मानसी तिवारी व स्वरा जाधव यांनी पटकाविला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हिंदुस्थानी संघाचा माजी कसोटीपटू प्रवीण अमरे, मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव उन्मेष खानविलकर, संयुक्त सचिव नीलेश भोसले, अरमान मलिक, क्रिकेटप्रेमी प्रदीप पालशेतकर यांच्या उपस्थितीत पार पडला.