सामना अग्रलेख – हे जिंकले कसे?

भाजपने महाराष्ट्रात असे काय दिवे लावले, कोणता विकास केला, जनहिताची कोणती कामे केली की, त्यामुळे महाराष्ट्राची जनता भाजप व शिंदे सेना, अजित पवारांना भरघोस मतदान करून विजयी करत आहे? अर्थात, हीच जनता पुन्हा निकालानंतर उघडपणे सांगते की, ‘‘आम्ही यांच्या कारभाराला आणि भ्रष्टाचाराला त्रासलो आहोत. आम्ही यांना मतदान केलेच नाही. मग हे विजयी कसे झाले हे रहस्यच आहे.’’ विधानसभा निवडणुकीतही जनतेने हाच प्रश्न केला व आता नगरपालिका निवडणुकीतही याच प्रश्नाचे उत्तर जनता शोधत आहे. यांना मते दिली कोणी? यांना विजयी केले कोणी? पैशांनीच हे विजय विकत घेतले जाणार असतील तर या महाराष्ट्राची आन, बान, शान धुळीस मिळाली आहे आणि शिवरायांचा महाराष्ट्र अदानी, शहांच्या पैशांचा लाचार बनून सरपटताना दिसत आहे. हे चित्र देशासाठी धोकादायक आहे!

सध्या देशातील कोणत्याही निवडणुका म्हणजे पैशांचा धुरळा उडवणारा खेळ झाला आहे. जो पैशांचा धुरळा उडवेल तोच निवडणुकांच्या मैदानात टिकेल. त्यामुळे राज्यातील नगरपालिका-नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप व त्यांच्या दोन बगलबच्च्यांना भरघोस यश मिळाले. त्यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. 288 नगराध्यक्षपदांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात भाजप शंभरपेक्षा जास्त जागांवर विजयी झाला. संपूर्ण आकडेमोड अद्यापि व्हायची आहे. अमित शहांची शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी चाळीसपेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, खरी शिवसेना व इतर असे मिळून साठच्या आसपास जागा जिंकल्याचे समोर आले. असेच चित्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी दिसले होते. तेव्हाही भाजप 132, शिंदे गट 57 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 41 अशाच जागा यांना मिळाल्या होत्या. म्हणजेच निवडणूक बदलली तरी निकालाचा पॅटर्न ‘सेट’च केलेला होता. त्या ‘सेटिंग’प्रमाणेच नगरपालिका आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निर्णय लागले आहेत. खरे म्हणजे या निवडणुकांत खरी लढत सत्ताधारी आणि विरोधकांत नव्हतीच. सत्ताधारी तीन पक्षांतच स्पर्धा आणि लढाईला रंग चढला होता. भाजपविरुद्ध शिंदे सेना व अजित पवार यांच्यातच मुकाबला झाला. हा मुकाबला पैसा आणि सत्तेच्या जोरजबरदस्तीचा होता हे आता पुराव्यासह उघड झाले. अनेक नगरपालिका क्षेत्रांत चार हजार ते दहा हजार रुपये प्रति मताचा भाव लागला होता. हा भाव शिंदे सेना व अजित पवारांनी लावला, पण भाजपने मताचा भाव 20 ते 25 हजारांवर नेऊन ठेवल्याने त्यांचे

आपापसात वाद

सुरू झाले. सिंधुदुर्गात शिंदे सेनेचे आमदार नीलेश राणे व भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात वादाची ठिणगी पडली ती याच कारणावरून. घराघरांत पैशांची पाकिटे पोहोचविण्यात आली व त्यानुसार मतदान करून घेतले गेले. नांदेड जिह्यातील धर्माबादचे उदाहरण पहा. धर्माबादेत 20 तारखेला मतदान झाले. भाजप पदाधिकाऱ्यांनी महिलांसह सुमारे 1500 मतदारांना ताब्यात घेऊन ओलीस ठेवले. या मतदारांना दोन हजारांपासून चार हजारांपर्यंत लाच देण्याचा प्रयत्न झाला. काही मतदारांनी ही लाच स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा त्यांना धमक्या दिल्या. मतदारांना ओलीस ठेवून त्यांना जबरदस्तीने पैसे वाटून निवडणुका लढवल्या व जिंकल्या जात असताना राज्याचा निवडणूक आयोग कुंभकर्णाच्या अवस्थेत जणू घोरत पडला होता. धर्माबादप्रमाणेच राज्यातील 288 नगरपालिका निवडणुकीत दहशत, अपहरण व पैशांच्या उधळाउधळीचा खेळ झाला. आधी उघडपणे मते चोरली गेली, नंतर बिनधास्तपणे मतदारांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले गेले. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने चार-पाच तास वाट पाहून मतदान न करताच लोक निघून गेले. विदर्भ-मराठवाड्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले, पण या प्रकाराची साधी दखलही निवडणूक आयोग घ्यायला तयार नसेल तर काय करायचे? प्रत्येक निवडणूक बेइमानी करूनच जिंकायची हा एकमेव धंदा भारतीय जनता पक्षाने सुरू केला आहे. इंग्रजांनंतर देशाची सर्वाधिक लूट भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी केली. त्याच लुटीच्या पैशांवर निवडणुका लढवून जिंकल्या जातात. पुन्हा ‘ड्रग्ज’चा पैसाही मोठ्या प्रमाणात निवडणुकीत वापरला गेला. त्यामुळे आपली लोकशाही काय करते व मतदार राजा

नक्की कसे मतदान

करतो? असा प्रश्न पडला आहे. बाजूच्या तेलंगणा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या व या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएमवर न घेतल्याची माहिती आहे. म्हणजे निवडणुका ‘बॅलट पेपर’वर झाल्या व या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांत काँग्रेसने मुसंडी मारून जोरदार विजय मिळवला. पंजाबातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेसला मागे टाकून ‘आप’ने जोरदार मुसंडी मारली. या दोन्ही राज्यांत भाजपने पैशांचा जोरदार खेळ करूनही तेथील मतदार विकला गेला नाही, पण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात वेगळेच घडत आहे. भाजपने महाराष्ट्रात असे काय दिवे लावले, कोणता विकास केला, जनहिताची कोणती कामे केली की, त्यामुळे महाराष्ट्राची जनता भाजप व शिंदे सेना, अजित पवारांना भरघोस मतदान करून विजयी करत आहे? भ्रष्टाचार, बेइमानी, लांड्यालबाड्या हेच कर्तृत्व वगैरे मानून मतदार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी ही प्रतारणा आहे. अर्थात, हीच जनता पुन्हा निकालानंतर उघडपणे सांगते की, ‘‘आम्ही यांच्या कारभाराला आणि भ्रष्टाचाराला त्रासलो आहोत. आम्ही यांना मतदान केलेच नाही. मग हे विजयी कसे झाले हे रहस्यच आहे.’’ विधानसभा निवडणुकीतही जनतेने हाच प्रश्न केला व आता नगरपालिका निवडणुकीतही याच प्रश्नाचे उत्तर जनता शोधत आहे. यांना मते दिली कोणी? यांना विजयी केले कोणी? पैशांनीच हे विजय विकत घेतले जाणार असतील तर या महाराष्ट्राची आन, बान, शान धुळीस मिळाली आहे आणि शिवरायांचा महाराष्ट्र अदानी, शहांच्या पैशांचा लाचार बनून सरपटताना दिसत आहे. हे चित्र देशासाठी धोकादायक आहे!