
आयआयटी पवई येथे विद्यार्थ्यांच्या आवडीचा बहुप्रतीक्षित टेक फेस्ट आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)

या टेक फेस्टमध्ये हिंदुस्थानासह परदेशातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे आणि नाविन्यपूर्ण विचारांचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.

फेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले रोबोट, रोबोटिक गाड्या, स्वयंचलित यंत्रसामग्री तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचे भव्य प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

विशेष आकर्षण ठरलेला मानवी रोबोट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह तंत्रज्ञानप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

हा रोबोट मानवी हालचालींची नक्कल करत असल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

या टेक फेस्टचा उद्देश विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.

विविध कार्यशाळा, स्पर्धा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून, तरुणाईमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाबाबतची आवड अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



























































