
वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांची नियोजन विभागात सचिवपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल साडेतीन महिन्यानंतर नियोजन विभागाला पूर्णवेळ सचिव मिळाला आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होत आहे. अधिवेशनात 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शैला ए. यांची बदली नियोजन विभागात झाली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा हे 31 ऑगस्ट 2025 रोजी नियत वयोमानुसार वित्त आणि नियोजन विभागातून सेवानिवृत्त झाले होते. तेव्हापासून नियोजन विभागाचा अतिरिक्त कार्यभार हा वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याकडे सोपवण्यात आला होता. शैला यांच्या बदलीने रिक्त झालेल्या वित्त विभागातील (आर्थिक सुधारणा) सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे देण्यात आला आहे.
दरम्यान, तुमसर (जि. भंडारा) उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. करिश्मा संख्ये यांची कळवण (जि. नाशिक) सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर चार्मोशी (जि. गडचिरोली) उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम. यांची गडचिरोली उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे.


























































