
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर सार्वजनिक बँका, खासगी बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडूनदेखील व्याज दरात कपात करण्यात येत आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने नव्या गृह कर्जाच्या व्याज दरात कपात केली आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने नव्या गृह कर्जाचा व्याज दर कमी करत 7.15 टक्के केला आहे. हाऊसिंग फायनान्स कंपनीने नवे दर 22 डिसेंबरपासून लागू केल्याची माहिती दिली आहे.
आरबीआयने रेपो रेटमध्ये डिसेंबर महिन्यात 25 बेसिस
पॉईंटची कपात केली. परिणामी गृह कर्जाचे व्याज दर कमी केले जात आहेत. घर खरेदीदार विचारपूर्वक निर्णय करत असल्याने व्याज दर कपात फायदेशीर ठरू शकतो. घर खरेदी किफायतशीर व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून सांगण्यात आले आहे.
एसबीआय 10 लाख कोटींचा टप्पा पार करणार
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृह कर्ज वाटपाबाबत माहिती दिली. कमी व्याज दर आणि गृह कर्जाची वाढती मागणी यामुळे पुढील आर्थिक वर्षात गृह कर्जाचे वितरण 10 लाख कोटींचा टप्पा पार करेल असे म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी गृह कर्ज वाटपाची आकडेवारी 9 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती दिली. स्टेट बँकेचा गृह कर्ज वाटपाचा व्यवसाय 14 टक्क्यांच्या वाढीसह पुढील आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 10 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असे म्हटले.



























































