श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिने बंद

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे भीमाशंकर येथे होणाऱया विकास आराखडय़ाच्या कामांनिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी पुढील तीन महिने बंद राहणार आहे.

2027 मध्ये नाशिक त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. कुंभमेळावेळी भीमाशंकर इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीदेखील मोठय़ा प्रमाणात गर्दी होईल हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱया भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहे. 2027 ला होणाऱया सिंहस्थ कुंभमेळा गर्दी व्यवस्थापन व इतर सोयीसुविधा यासाठी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 288.17 कोटींच्या विस्तृत विकास आराखडय़ास मान्यता देण्यात आली आहे. विकास आराखडय़ातील कामांना गती देण्यासाठी प्रशासन, भीमाशंकर देवस्थान व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने बैठक झाली.

तीन महिन्यांसाठी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला ग्रामस्थांनी सहमती दर्शविली. प्रशासकीय अधिकारी हे भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट स्थानिक ग्रामस्थ यांचे म्हणणे व बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱयांना सादर करतील. यानंतरच जिल्हाधिकारी मंदिर बंदबाबतचा आदेश काढणार आहेत.