
बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसंदर्भात एक महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा कारणांचा हवाला देत कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारे सर्व सामने आता बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे हलवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे खेळाडू, टीम मॅनेजमेंट आणि प्रशंसकांचे लक्ष वेधले गेले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम देशातील सर्वात प्रतिष्ठत क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते.
सुरक्षा कारणांमुळे बदलला सामना स्थळ
राज्य सरकार आणि बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलेल्या सुरक्षा व गर्दी नियंत्रणाशी संबंधित चिंतेनंतर हा निर्णय घेण्यात आला. अधिकार्यांच्या मते, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आवश्यक सुरक्षा मानके आणि आपत्कालीन तयारीत काही गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे तेथे सामने खेळवण्यास परवानगी देण्यात आली नाही. परिणामी, विजय हजारे ट्रॉफीचे सर्व सामने आता बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये होणार आहेत.
संघांना बदलाची तत्काळ माहिती
या बदलाची माहिती तत्काळ संबंधित संघांना देण्यात आली आहे. ज्या संघांचे सामने आधी चिन्नास्वामी स्टेडियमवर नियोजित होते, त्यांचे सामन्यापूर्वीचे सराव सत्रही आता बीसीसीआय सीओईमध्येच होतील, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले. दिल्ली संघाला आंध्र प्रदेशविरुद्ध होणार्या सामन्यासाठी तसेच सरावासाठी नव्या स्थळाची माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होऊ नये.
प्रेक्षकांशिवाय होणार सामने
सुरक्षेला प्राधान्य देत बंगळुरूमध्ये विजय हजारे ट्रॉफीचे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगळुरू पोलिसांनी सीओईच्या आसपास असलेल्या येलहंका पार्क परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थेची हमी दिली आहे. अधिकार्यांच्या मते मर्यादित प्रवेश असलेल्या या परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवता येईल.
पोलीस व प्रशासनाची संयुक्त तपासणी
हा निर्णय कोणत्याही एका विभागाचा नसून सविस्तर पाहणीनंतर घेण्यात आला आहे. बंगळुरू पोलीस आयुक्त, ग्रेटर बंगळुरू महानगरपालिका, अग्निशमन विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे स्टेडियमची तपासणी केली. या तपासणीत पायाभूत सुविधा, विद्युत व्यवस्था, अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन निर्गम यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला.
17 मुद्यांच्या सुरक्षा सूचनांचा आधार
बंगळुरू पोलीस आयुक्तांनी यापूर्वीच 17 मुद्यांची सुरक्षा ऍडव्हायजरी जारी केली होती. सरकारने नियुक्त केलेल्या समितीने या सूचनांचे पालन झाले आहे की नाही, याची पडताळणी केली. तपासणी अहवालात आवश्यक मानकांची पूर्ण अंमलबजावणी न झाल्याचे समोर आल्याने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामने घेण्याची परवानगी रद्द करण्यात आली.
‘केएससीए’च्या तयारीवर प्रश्नचिन्ह
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) यापूर्वी चिन्नास्वामी स्टेडियम मोठया सामन्यांच्या आयोजनासाठी पूर्णतः तयार असल्याचा दावा केला होता. मात्र प्रशासकीय अहवालानंतर चित्र बदलले. अधिकार्यांनी सविस्तर अहवाल सरकारकडे सादर केला असून, त्याच आधारावर हा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

























































