
अलीकडेच जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था कोलमडली, तेव्हा हजारो प्रवाशांना विमानतळांवर तासनतास वाट पाहावी लागली आणि अनेकांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचता आले नाही. देशाच्या विमान वाहतूक क्षेत्र इंडिगोच्या एकाधिकारशाहीमुळे ही परिस्थिती उद्भवली, असं बोललं जातं. यातच आता हिंदुस्थानी विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना मंजुरी दिली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केरळ येथील अल हिंद एअर आणि हैदराबाद येथील फ्लाय एक्सप्रेस या दोन नवीन विमान कंपन्यांना ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (एनओसी) जारी केले आहे. यामुळे इंडिगो आणि एअर इंडियाच्या वर्चस्वाला आव्हान मिळणार असून, प्रवाशांना अधिक पर्याय आणि स्वस्त तिकीट दर मिळण्याची शक्यता आहे.
अल हिंद एअर ही अलहिंद ग्रुपची कंपनी असून, ती पर्यटन आणि प्रवास क्षेत्रात कार्यरत आहे. तर फ्लाय एक्सप्रेस ही कुरियर आणि कार्गो सेवेत असलेली कंपनी आहे. यादी उत्तर प्रदेशातील शंख एअरला एनओसी मिळाली असून, तीही लवकरच सेवा सुरू करणार आहे, असं बोललं जात आहे.


























































