आकाश नेक्स्ट जनरेशन मिसाइल डिफेन्स सिस्टीमची यशस्वी चाचणी, ८० किमी पर्यंतचे लक्ष्य करू शकते नष्ट

हिंदुस्थानच्या आकाश नेक्स्ट जनरेशन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. डीआरडीओने ही चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. चाचणी दरम्यान, आकाश-एनजी क्षेपणास्त्रांनी सीमेजवळ, कमी उंचीवर तसेच लांब पल्ल्यावर प्रभावीपणे लक्ष्यांवर मारा केला.

आकाश-एनजी ही पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रणाली आहे, ज्यात देशी रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) सीकर, ड्युअल-पल्स सॉलिड रॉकेट मोटर आणि स्वदेशी रडार तसेच कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचा समावेश आहे. या प्रणालीची मारक क्षमता सुमारे ७० ते ८० किलोमीटरपर्यंत आहे. तर ती १८ ते २० किलोमीटर उंचीपर्यंतच्या हवाई धोक्यांना रोखू शकते.

क्षेपणास्त्राची गती मॅक २.५ (ध्वनीच्या गतीपेक्षा २.५ पट) इतकी आहे आणि ती एकाच वेळी अनेक लक्ष्यांना निशाणा बनवू शकते. दरम्यान, या यशस्वी चाचण्यांनंतर आकाश-एनजी लवकरच हिंदुस्थानी वायुदल आणि सेनेत सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.