हिंदुस्थानी खेळाडूंची आयसीसी क्रमवारीत घोडदौड

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर जाहीर झालेल्या आयसीसी पुरुष खेळाडू क्रमवारीत हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी लक्षणीय झेप घेतली आहे. ही मालिका हिंदुस्थानने 3-1 अशी जिंकत वर्चस्व सिद्ध केले. अहमदाबादमध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करत 231 धावांचा भक्कम डोंगर उभारला. या सामन्यात तिलक वर्माने 42 चेंडूंमध्ये 73 धावांची दमदार खेळी करत टी-20 फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली. या कामगिरीमुळे तो थेट तिसऱया स्थानावर पोहोचला असून ही त्याच्या कारकीर्दीतील मोठी कामगिरी मानली जात आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराने चार षटकांत अवघ्या 17 धावा देत दोन विकेट घेतल्या. त्याच्या किफायतशीर आणि प्रभावी गोलंदाजीमुळे हिंदुस्थानला सामना जिंकण्यात यश आले. या कामगिरीचा फायदा बुमराला क्रमवारीत दहा स्थानांची झेप घेत मिळाला आहे. दरम्यान, वरुण चक्रवर्तीने सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखत टी-20 गोलंदाजी क्रमवारीतील अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे.