
बिहारचा वैभव सूर्यवंशी हा पुरुषांच्या लिस्ट-ए क्रिकेटमध्ये शतक झळकाविणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने वयाच्या 14 वर्षे आणि 272 दिवसाचा असताना हा विक्रम केला. सुर्यवंशीने अरूणाचल प्रदेशविरूद्ध 84 चेंडूंत 15 षटकार व 16 चौकारांसह 190 धावांची तुफानी खेळी केली. यापूर्वी हा विक्रमा् झहूर इलाहीच्या नावावर होता. 1986 मध्ये रेल्वेविरुद्ध केवळ आपल्या दुसर्याच लिस्ट-ए सामन्यात नाबाद 103 धावा करताना त्याचे वय 15 वर्षे आणि 209 दिवस होते. वैभव सुर्यवंशीने तब्बल 39 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा विक्रम मोडीत काढला.
डिव्हिलियर्सलाही पछाडले
वैभव सूर्यवंशीने अवघ्या 54 चेंडूंमध्ये 150 धावा पूर्ण करत लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात जलद 150 धावांचा एबी डिव्हिलियर्सचा जागतिक विक्रम मोडीत काढला. याआधी डिव्हिलियर्सने 64 चेंडूंमध्ये 150 धावा करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. वैभव 84 चेंडूंमध्ये 190 धावा करून बाद झाला.
वैभवसाठी विक्रम मोडणे नवीन नाही
वैभव सूर्यवंशीसाठी विक्रम मोडणे नवीन नाही. हिंदुस्थानकडून त्याने सर्वात जलद युवा कसोटी शतक (58 चेंडू) झळकावले आहे. तसेच 12 वर्षे 284 दिवसांच्या वयात रणजी ट्रॉफीत पदार्पण करत विक्रम रचला होता. याशिवाय, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने 61 चेंडूंमध्ये शतक ठोकले आहे. आयपीएल लिलावात उतरणारा सर्वात तरुण खेळाडू, तसेच आयपीएल खेळणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू हाही मान त्याच्या नावावर आहे. आयपीएलमध्ये त्याने 35 चेंडूंमध्ये शतक झळकावत इतिहास रचला होता. हे आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात जलद आणि हिंदुस्थानमधील सर्वात वेगवान शतक आहे. या कामगिरीसह त्याने युसूफ पठाणचा (37 चेंडू) विक्रमही मोडला. आता वैभवची तुलना हिंदुस्थानातील दिग्गज क्रिकेटपटूंशी होऊ लागली आहे.





























































