
हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंग याची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड समितीने एकमेव नामांकन केले आहे. तसेच युवा स्टार बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, ऐतिहासिक कामगिरी करणारा डेकॅथलिट तेजस्विन शंकर याच्यासह एकूण 24 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
योगासन खेळाडू आरती अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत
27 वर्षीय हार्दिक सिंग हा हिंदुस्थानी हॉकी संघाच्या मधल्या फळीतील प्रमुख आधारस्तंभ ठरला आहे. 2021 च्या टोकियो आणि 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱया हिंदुस्थानी संघाचा तो सदस्य होता. याशिवाय याच वर्षी आशिया चषकात सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिंदुस्थानी संघातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. यंदा निवड समितीने एक ऐतिहासिक निर्णय घेत योगासन खेळाडू आरती पाल हिला ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. क्रीडा मंत्रालयाकडून औपचारिक मान्यता मिळाल्यानंतर पाच वर्षांनी प्रथमच एखाद्या योगासनपटूला हा सन्मान मिळणार आहे. आरती सध्या राष्ट्रीय व आशियाई विजेती असून, 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत योगासन हा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समाविष्ट असणार आहे.
‘अर्जुन’ पुरस्कारासाठी निवड झालेल्या इतर प्रमुख नावांमध्ये बुद्धिबळपटू विदित गुजराथी, 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता तेजस्विन शंकर, नेमबाज मेहुली घोष, जिम्नॅस्ट प्रणिती नायक, तसेच हिंदुस्थानची अव्वल महिला बॅडमिंटन जोडी त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा समावेश आहे. गायत्री ही राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक व माजी ऑल इंग्लंड विजेते पुलेला गोपीचंद यांची कन्या आहे.
यंदा कोणत्याही क्रिकेटपटूचा समावेश नाही
यंदाच्या यादीत कोणत्याही क्रिकेटपटूला स्थान देण्यात आलेले नाही. यापूर्वी 2023 मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ‘अर्जुन’ पुरस्कार मिळाला होता. उल्लेखनीय म्हणजे ‘खेलरत्न’ हा देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असून त्यात पदक, प्रशस्तिपत्र आणि 25 लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाते, तर ‘अर्जुन’ पुरस्कारांतर्गत 15 लाख रुपये प्रदान केले जातात. मागील वर्षी ‘खेलरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार डी. गुकेश, हरमनप्रीत सिंह, प्रवीण कुमार आणि मनू भाकर यांना प्रदान करण्यात आला होता.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी शिफारस केलेले खेळाडू
मेजर ध्यानचंद खेलरत्न ः हार्दिक सिंग (हॉकी) अर्जुन पुरस्कार ः तेजस्विन शंकर (ऍथलेटिक्स), प्रियांका (ऍथलेटिक्स), नरेंद्र (बॉक्सिंग), विदित गुजराथी (बुद्धिबळ), दिव्या देशमुख (बुद्धिबळ), धनुष श्रीकांत (डेफ शूटिंग), प्रणिती नायक (जिम्नॅस्टिक्स), राजकुमार पाल (हॉकी), सुरजीत (कबड्डी), निर्मला भाटी (खो-खो), रुद्रांश खंडेलवाल (पॅरा शूटिंग), एकता भ्यान (पॅरा ऍथलेटिक्स), पद्मनाभ सिंह (पोलो), अरविंद सिंह (रोइंग), अखिल शेरॉन (शूटिंग), मेहुली घोष (शूटिंग), सुतीर्था मुखर्जी (टेबल टेनिस), सोनम मलिक (कुस्ती), आरती (योगासन), त्रिशा जॉली (बॅडमिंटन), गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), लालरेम्सियामी (हॉकी), मोहम्मद अफसल (ऍथलेटिक्स), पूजा (कबड्डी).































































