मराठी ऐक्याचा मंगल कलश! आनंदवनभुवनीं!! ठाकरे बंधूंची युती झाली! महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती!! शिवसैनिक-मनसैनिकांचा जल्लोष… ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत शिवसेना-मनसे युतीची ऐतिहासिक घोषणा केली. वरळी येथील ‘ब्ल्यू सी’ या हॉटेलात भरगच्च पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी तर जल्लोष केलाच, परंतु दूरचित्रवाणी वाहिन्या आणि समाज माध्यमांवर हा क्षण पाहणाऱ्या घराघरांत-मनामनांत या वेळी आनंद साजरा झाला. महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले स्वप्न यानिमित्ताने साकार झाले. मराठी ऐक्याचा मंगल कलश घराघरांत पोहोचल्याचा आनंद व्यक्त झाला. मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये जबरदस्त जोश निर्माण झाला असून सर्वत्र ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी धूमधडाका उडवून दिला. दरम्यान, युतीची घोषणा करताना ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाचा शंखनाद केला आहे, असे मत राजकीय निरीक्षकांनी नोंदवले.