अर्थव्यवस्थाच नाही, समाजही मृत होत चाललाय! उन्नाव पीडितेसोबतच्या गैरवर्तनावरून राहुल गांधी यांचा हल्ला

न्यायाची मागणी करणाऱया उन्नाव बलात्कार पीडितेसोबत पोलिसांनी आज केलेल्या गैरवर्तनावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘केवळ अर्थव्यवस्थाच मृत होतेय असे नाही तर समाजही मृतवत होत चालला आहे हेच दिसते,’ अशी खंत राहुल यांनी व्यक्त केली.

उन्नाव बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेला भाजप नेता कुलदीप सेंगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पीडित तरुणी व तिची आई निदर्शने करत होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. पीडितेला अक्षरशः हातपाय धरून उचलून नेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ ’एक्स’वर शेअर करत देशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ’सामूहिक बलात्कार पीडितेला अशी वागणूक योग्य आहे का? न्यायासाठी आवाज उठवण्याचे धाडस केले हा तिचा दोष आहे का? बलात्काऱयांना जामीन आणि पीडितांना गुन्हेगारांसारखे वागवले जाते, हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे?,’ असा सवाल राहुल गांधी यांनी केला. लोकशाहीमध्ये, मतभेदांचा आवाज उठवणे हा अधिकार आहे आणि तो दाबणे हा गुन्हा आहे. पीडितेला आदर, सुरक्षा आणि न्याय मिळायला हवा, असे राहुल गांधी म्हणाले.

निराशाजनक आणि लज्जास्पद

उन्नाव प्रकरणातील पीडित तरुणी भीतीच्या सावटाखाली जगत आहे. तिला वारंवार त्रास दिला जात आहे. अशी परिस्थिती असताना गुन्हेगाराला जामीन मिळाला हे अत्यंत निराशाजनक आणि लज्जास्पद आहे. आपण केवळ मृत अर्थव्यवस्था नाही, तर एक मृत समाजदेखील बनत आहोत हेच या अमानुष घटनांमधून दिसते,’ असे राहुल म्हणाले. दरम्यान, पीडित तरुणी व तिच्या आईने आज राहुल गांधी यांची भेटही घेतली.

सेंगरच्या जामिनावर पीडितेची आई भडकली!

सेंगरच्या जामिनाच्या निर्णयावर पीडित तरुणीची आई आशादेवी यांनी संताप व्यक्त केला. ’न्यायालयाने स्वतःच स्वतःला थट्टेचा विषय बनवून टाकले आहे. पीडितेचे अख्खे कुटुंब दहशतीखाली आणि सुरक्षेत जगत असताना आरोपीला सोडले जाते हा कुठला न्याय आहे? आरोपीने पीडितेच्या घरापासून 500 किमी दूर राहावे वगैरे असे नवेच नियम बनवले जात आहेत. गुन्हेगाराला जामीन मिळताच कामा नये. ऑपरेशन हा सुटकेसाठी केलेला एक बहाणा आहे. ऑपरेशन करायचे तर ते अटकेत राहूनही होऊ शकते, असे आशा देवी म्हणाल्या.