
महिलांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सूचनेवरून बेस्ट प्रशासनाने आपल्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कार्यवाहीला गती दिली आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या 249 बसेसमध्ये 400हून अधिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून फेब्रुवारीपर्यंत बेस्टच्या ताफ्यातील सर्वच बसगाड्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत महिला आणि अल्पवयीन मुलांच्या प्रवासात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयाने बेस्ट उपक्रमाला सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या बेस्टच्या सेवेत धावणाऱ्या खासगी कंत्राटदारांच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. मात्र बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसमध्ये कॅमेऱ्यांचा अभाव आहे. परिणामी महिलांची छेड काढणे, पाकिटमारी अशा प्रकारचे गुन्हे प्रवासात घडत आहेत. सीसीटीव्ही असतील तर गुन्हेगारांचा शोध घेता येणार आहे.
स्पष्ट फुटेजसाठी सर्व कॅमेरे तपासणार
बेस्टच्या सेवेतील खासगी कंत्राटदारांच्या गाड्यांमध्ये आधीपासून सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र त्यातील सर्व कॅमेरे सुस्थितीत आहेत का? त्यांचे फुटेज सुस्पष्ट आहे का? ते फुटेज गुह्यांच्या तपासात पोलिसांना उपयुक्त ठरू शकणारे आहे का? याचा आढावा घेतला जात आहे. खासगी कंत्राटदार कंपन्यांना त्यांच्या बसेसमधील नादुरुस्त, अस्पष्ट फुटेज मिळणारे सीसीटीव्ही बदलून त्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसवण्याच्या सूचना बेस्ट उपक्रमाने दिल्या आहेत.





























































