
परळ, प्रभादेवीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न न सोडवता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एलफिन्स्टन पुलाच्या पाडकामाला घाई केली. त्यावेळी पूल पाडकाम आणि वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी ‘डेडलाईन’ही जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र काम रेंगाळले आहे. पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी
‘ब्लॉक’ला अंतिम मंजुरी देण्यास रेल्वे बोर्डाकडून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम रखडून स्थानिक रहिवाशांसह रेल्वे, बेस्ट व एसटीच्या प्रवाशांना दीर्घकाळ फटका बसण्याची शक्यता आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गिकेवर विस्तारलेला ब्रिटीशकालीन एलफिन्स्टन पूल पाडून त्या जागी वरळी-शिवडी उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. यासाठी 12 सप्टेंबरपासून एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम हाती घेतले होते. हे काम 60 दिवसांत अर्थात दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, मात्र चार महिने उलटत आले तरी पुलाचे पाडकाम पूर्ण झाले नाही. दोन्ही बाजूकडील रस्त्याचा भाग नोव्हेंबरमध्ये हटवण्यात आला आणि रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी महाकाय क्रेन तैनात करण्यात आल्या. पण मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन स्वतंत्र प्रशासनाच्या पातळीवर रेल्वे वाहतुकीच्या ‘ब्लॉक’चा मुद्दा खोळंबला आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक पातळीवर ब्लॉक घेण्यास सहमती देण्यात आली. तेथून प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. त्यावर बोर्डाने अद्याप अंतिम मंजुरी न दिल्यामुळे पुलाचा लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम ठप्प झाले आहे. पुलाचे काम वेळीच मार्गी लावण्यासाठी ‘महारेल’कडून पाठपुरावा सुरू आहे. प्रत्यक्षात
‘ब्लॉक’चे वेळापत्रक निश्चित होत नसल्याने ‘महारेल’ची कोंडी झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या या दिरंगाईमुळे वरळी-शिवडी उन्नत मार्गाचे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता धूसर बनली आहे. परिणामी, प्रकल्प खर्च वाढण्याबरोबर स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना दीर्घकाळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
रस्ते वाहतुकीबरोबर विविध सेवांवर परिणाम
एलफिन्स्टन पूल बंद झाल्यापासून दादर, परळ, वरळी परिसरात वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. बेस्टच्या बसेस आणि एसटी गाड्यांना लांबचा वळसा घालून प्रवासी सेवा द्यावी लागत आहे. परळ भागातील रुग्णालयांत जाणाऱ्या रुग्णवाहिकांचा ठिकठिकाणी खोळंबा होत आहे. रुग्ण, विद्यार्थी, वृद्ध आणि दिव्यांग नागरिकांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या रखडपट्टीवर नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.





























































