
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंनी एकत्र आल्याने निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आणि भाजपसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग दिवसभर तोंडाची डबडी वाजवण्याची गरज काय, काल दिवसभर तुमचे प्रवक्ते ही युती कशी आहे, अमुक-तमुक बोलत होते, मग त्याची गरज काय, असे राऊत म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, सोडून द्या ना तुम्ही. 16 तारखेला आपण यावर चर्चा करू.
संजय राऊत म्हणाले की, मला सांगा भारतीय जनता पक्षाने किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं. एक गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही. बेळगाव–कारवार सीमाप्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही. गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद आहे. बाकी कोणत्या भाजप नेत्याने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला ते सांगा. या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी कुणीही नाही, असे ते म्हणाले. अधिवेशनकाळात “वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू” असे बोलले गेले, त्यावर मुख्यमंत्री म्हणून उभे राहिले पाहिजे होते. ठाकरे खरेच उभे राहिले. “कसा तोडताय बघू” असे म्हणाले. पण मुख्यमंत्री उभे राहिले का आणि जाब विचारला का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
“तुम्ही आम्हाला मराठी माणसाच्या गोष्टी काय शिकवता? ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात. नाहीतर राज्याचे तुकडे करून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. आम्ही ते होऊ दिलं नाही. ही तुमची पोटदुखी आहे. आम्ही मुंबई वेगळी होऊ दिली नाही. ही तुमची पोटदुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रात आम्ही संघर्ष करून ठेवलेलं आहे. ही तुमची पोटदुखी नाही तर काय?” असे राऊत म्हणाले.
“तुम्ही काय केलं मराठी माणसासाठी ते दाखवा. दहा कामं दाखवा. गौतम अडाणीला मुंबई विकणं म्हणजे मराठी माणसासाठी काम नाही. मोदींच्या मित्राला अख्खी मुंबई विकणं किंवा फुकटात घशात घालणं ही मराठी माणसासाठी सेवा नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेना-मनसे युतीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्याना संजय राऊत यांनी सुनावले. संजय राऊत म्हणाले की, तुम्ही काय एकमेकांना चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांच्या मालिश करतात. मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, ते मालिश करतात. मग दोघे मिळून अजित पवारची मालिश करतात. सत्तेसाठीच तुम्ही एकत्र आलेले आहात ना?,” असे उपरोधिक वक्तव्य त्यांनी केले.
राऊत म्हणाले की, तुम्ही आमची शिवसेना फोडली. मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एका लफंग्याच्या हातात दिली. हे तुमचं मराठीप्रेम आहे का? मतभेद राजकीय असू शकतात, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचं पाप तुम्ही केले आहे आणि हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल.
वंदे मातरम संदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, “वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच. तुम्ही कधी म्हणायला लागलात? स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटलं नाही. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष तुम्ही वंदे मातरम म्हटलं नाही. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून आठवण झाली.” अनेक मुस्लिम क्रांतिकारकांनी “वंदे मातरम”चा जयघोष करत फासावर जात प्राण दिले. अशफाकुल्ला खानपासून सोलापुरातील अनेकांचे त्यांनी उदाहरण दिले. “तुमच्या वैचारिक पूर्वजांपैकी कोणी फासावर गेला का वंदे मातरम म्हणत? ज्यांच्या लोकांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला, ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नव्हते, अशांनी आम्हाला काय शिकवायचे?” असेही त्यांनी म्हटले आणि “देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवू नका” असा टोला लगावला.
मनसेसोबतच्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, बाळा नांदगावकर आजारी असूनही दोन दिवस ते त्या परिस्थितीत चर्चा करत होते. दिवस–रात्र बैठका सुरू होत्या. त्यामुळेच ते काल दिसले नाहीत आणि आजही आजारी आहेत. शिंदे यांनी स्वतःची मुलं (आमदार) सांभाळावीत कारण भाजप त्यांची मुलं पळवणार आहे, असे राऊत यांनी म्हटले. “जशा कुत्रे पकडण्याच्या गाड्या असतात तसे पिंजरे भाजपने लावले आहेत. महापालिकेनंतर कोणाची पोरं कोण पळवतंय ते दिसेल,” असा इशाराही त्यांनी दिला. शिंदे गटाबद्दल बोलताना त्यांनी “आता ते अनौरस आहेत, पक्ष चोरीचा आहे, ज्या पक्षाचा बापच चोरीचा आहे तो अनौरसच आहे” अशीही तीव्र टीका केली आणि अमित शहांनी नाव दिले म्हणून तो पक्ष मानला जातो, असे म्हटले.
मुंबईतील जागावाटपाबद्दल राऊत म्हणाले की, मुंबईतील जागा किती आहेत त्यानुसार जागावाटप होईल. कुणाची कुठे ताकद आहे त्यानुसार वाटप केले जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत हव्या आहेत. मनसे आणि शिवसेनेतल्या जागावाटपाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. “आकड्यावर युती अडकू नये. जिंकणाऱ्या जागांच्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे. एखादा उमेदवार दहा वर्षांपूर्वी जिंकत होता, पण आज परिस्थिती बदलली असेल तर त्यानुसार निर्णय घेतले पाहिजेत. एक एक जागा महत्त्वाची आहे. मुस्लिम हा विषय नाही. मुस्लिम आमच्यासोबत आहे,” असे राऊत म्हणाले.




























































