
नाशिकमध्ये इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अनेकांवर गंभीर आरोप असल्याने गिरीश महाजनांना दाऊद सारखी गँग तयार करायची आहे का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच कुणालाही न जुमानता इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतात. हे या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारे कृत्य आहे असेही संजय राऊत म्हणाले.
आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, असा दावा ते करतात. भाजपकडे सर्वाधिक म्हणजेच 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. गौतम अदाणीसुद्धा भाजपचा सदस्य आहे. तरीही त्यांना इतराचे नगरसेवक, आमदार आणि खासदार फोडावे लागतात, हे श्रीमंत भिकाऱ्यांचे लक्षण आहे. श्रीमंत जेव्हा भिकारी होतो तेव्हा तो अत्यंत लाचार आणि लोचट होतो. गिरीश महाजनांचा चेहरा पहा. त्यांच्या पक्षातल्या लोकांचा विरोध आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. आमदार देवयानी फरांदे रस्त्यावर उतरले आहेत. त्या आधी सीमा हिरे रस्त्यावर उतरल्या होत्या. तरीही कुणालाही न जुमानता इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना फोडून विकत घेतात. हे या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारे कृत्य आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी हे राजकीय चारित्र्याच्या गप्पा मारतात. मग नाशिकमध्ये ज्यांच्यावर तुम्ही कालपर्यंत भ्रष्टाचाराचे, गुंडगिरीचे, अंडरवर्ल्डचे आरोप करत होतात. ते सगळेच तुमच्या पक्षातच कसे. गिरीश महाजनांना दाऊद सारखी गँग तयार करायची आहे का? असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना मनसे युती झाली म्हणून नाशिकमध्ये दिनकर पाटील लाडू भरवत होते. काही नाचत होते. नाचत, नाचत भाजपमध्ये गेले. यात निर्लज्ज कुणाला म्हणायचं? जाणाऱ्यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं? काही लोक म्हणतात की आम्ही विकासासाठी भाजपमध्ये गेलो. आता अमेरिकेचा विकास व्हावा म्हणून डोनाल्ड ट्रम्पही भाजपमध्ये जाणार आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

























































