
दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे (AAP) नेते सौरभ भारद्वाज, संजय झा आणि आदिल अहमद खान यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. हा खटला ख्रिश्चन समुदायाचे पवित्र प्रतीक असलेल्या सांताक्लॉजचे कथित अपमानजनक चित्रण करण्याशी संबंधित आहे. वकील खुशबू जॉर्ज यांच्या तक्रारीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वकील खुशबू जॉर्ज यांच्या तक्रारीनुसार, १७ आणि १८ डिसेंबर २०२५ रोजी आप नेत्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर झाल्यानंतर वाद सुरू झाला. हा व्हिडीओ दिल्लीतील कनॉट प्लेस येथे झालेल्या राजकीय कार्यक्रमाचा भाग होता. असा आरोप आहे की, व्हिडीओमध्ये ख्रिश्चन समुदायाचे आदरणीय धार्मिक-सांस्कृतिक प्रतीक असलेल्या सांताक्लॉजचे अत्यंत अपमानजनक आणि आक्षेपार्ह पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे.
तक्रारदार खुशबू जॉर्ज यांचा आरोप आहे की, व्हिडीओमध्ये सांताक्लॉज रस्त्यावर बेशुद्ध पडताना दाखवण्यात आला आहे. त्याचा वापर धार्मिक व्यक्ती म्हणून न करता राजकीय संदेश देण्यासाठी केला गेला. व्हिडीओच्या एका भागात सांता क्लॉज सिम्युलेटेड सीपीआर करताना दिसत आहे. ज्याला ख्रिश्चनांनी संत निकोलस आणि ख्रिसमसच्या पावित्र्याची थट्टा मानली जात आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिताच्या (IPC) कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



























































