लेख – चीनची वाढती निर्यात आणि परिणाम

>> अनिल दत्तात्रेय साखरे

चीनचे वाढते निर्यात आधिक्य ही योगायोगाने घडलेली बाजारपेठीय घटना नसून ती धोरणात्मक नियोजन, युवा शक्तीचा प्रभावी वापर, संशोधनातील गुंतवणूक आणि जागतिक बाजारपेठेचा अचूक अभ्यास यांचा परिपाक आहे. जागतिक तणावाच्या काळातही आर्थिक आघाडीवर मिळवलेले यश अतुलनीय आहे. आज पण भारत-चीन व्यापारात चीन आघाडीवर असून 100 अब्ज डॉलरच्या फरकाने भारत मागे आहे. भारतासाठी यातून बोध म्हणजे प्रत्यक्ष परिणाम देणारे उद्योग धोरण मजबूत केले पाहिजे. त्यासोबत जपान, कोरियाप्रमाणे उत्पादनाची नावीन्यता, सुबकता आणि जागतिक तोडीचा दर्जा यावर लक्ष देणे जरुरी आहे, तरच भारताची व्यापार तूट कमी होईल.

चीनचे जागतिक व्यापार आधिक्य एक ट्रिलियन डॉलरच्या पुढे असणे म्हणजे चीनची निर्यात आयातीपेक्षा जवळपास एक लाख कोटी डॉलरने जास्त होणे. जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थान अधिक मजबूत झालेले आहे. या वर्षी प्रथमच चीनची निर्यात 2025 वर्षाअखेर जवळपास 1.25 ट्रिलियन डॉलरने वाढलेली असेल हे त्यांच्या जागतिक आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. चीनचा हा वाढलेला प्रभाव जागतिक व्यापारामध्ये असमतोल दर्शवतो आणि त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. मुख्यतः जागतिक बाजारपेठेतील चिनी उत्पादनांच्या किमती कमी असल्यामुळे भारताला निर्यातीमध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.

साम्यवादी चौकटीत राहूनही चीनने भांडवलवादी जगाला लाल गालिचा अंथरला, 1980-90 च्या दशकापासून त्यांनी पुढील शंभर वर्षांचा रोड मॅप बनवला. उगीचच डावी पोथीनिष्ठा जपत साम्यवादी-भांडवलवादी विचारांच्या चक्रव्यूहात तो देश अडकून राहिला नाही. काळानुसार उत्पादन, संशोधन, तंत्रज्ञान आणि जागतिक पुरवठा साखळीवर एकछत्री सत्ता निर्माण केली. त्यामुळेच त्यांचे जागतिक व्यापार आधिक्य एक ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. जगभरात सध्या युद्धग्रस्त व तणावग्रस्त परिस्थिती असताना चीनचे निर्यात आधिक्य तब्बल एक लाख कोटी डॉलरने वाढणे ही घटना केवळ आर्थिक आकडय़ांपुरती मर्यादित नाही, तर ती चीनच्या दीर्घकालीन धोरणात्मक नियोजनाचे प्रतीक आहे. युव्रेन-रशिया युद्ध, मध्यपूर्वेतील संघर्ष, अमेरिका-चीन व्यापारी युद्ध, जागतिक पुरवठा साखळीतील तुटवडा आणि वाढणारी महागाई अशा अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्येही चीनने आपली जागतिक व्यापारी पकड अधिक मजबूत केली आहे. अगदी कपडय़ांपासून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत, दुचाकीपासून नवीन इलेक्ट्रिक मोटारीपर्यंत एक वेगळी औद्योगिक परिसंस्था चीनने विकसित केली आहे

यामागे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकेने लादलेले व्यापार निर्बंध आणि मोठय़ा प्रमाणात वाढवलेले आयात शुल्क. अमेरिकेने चीनविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे चीनने आपले लक्ष केवळ पाश्चात्त्य बाजारपेठांवर न ठेवता आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि मध्यपूर्व या नव्या व उभरत्या बाजारपेठांकडे वळवले. ‘वन बेल्ट वन रोड’सारख्या उपक्रमांमुळे या देशांशी असलेले व्यापारी संबंध अधिक दृढ झाले.

चीनच्या प्रचंड भौगोलिक आकारामुळे उपलब्ध असलेला वेगवेगळ्या दुर्मिळ खनिजांचा मोठा साठा, त्यासोबतच प्रचंड लोकसंख्या. त्यामुळे उपलब्ध असलेले स्वस्त आणि कुशल मनुष्यबळ या दोन्ही गोष्टींनी उत्पादन क्षमता वाढवली. त्यासोबत जागतिक बाजारात आपली वस्तू स्वस्त ठेवण्यासाठी चीनने आपले चलन युवानचे मूल्य कृत्रिमरीत्या कमकुवत ठेवले, ज्यामुळे त्यांची निर्यात अधिक स्पर्धात्मक झाली. चीन अजूनही जगाची फॅक्टरी म्हणून ओळखला जातो. यासोबतच संशोधन व विकास क्षेत्रात चीनने केलेली प्रचंड गुंतवणूक लक्षवेधी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहने, सोलार पॅनेल्स, सेमीकंडक्टर्स, बॅटरी तंत्रज्ञान अशा क्षेत्रांत चीनने नावीन्यपूर्ण संकल्पना विकसित करून उत्पादनातील उत्कृष्टता साधली आहे.

इलेक्ट्रिक उपकरणे, वैद्यकीय उपकरणे यांमध्ये लागणारे अर्धसंवाहक आणि दुर्मिळ संयुगे यांचे उत्पादन आणि व्यावसायिक वापर यावर तर चीनची जागतिक मत्तेदारीच आहे. भारताला फक्त चीनवर दोष ठेवून चालणार नाही. आपण स्वतः संशोधन, उत्पादन, नवकल्पना आणि जागतिक स्पर्धात्मकता इथे किती मजल मारू शकतो याचे कठोर आत्मपरीक्षण करायला हवे. भारतात पायाभूत सुविधांची मोठय़ा प्रमाणावर कामे सुरू आहेत, पण त्यांना लागणारी अवजड मशिनरी, जसे टनेल बोअरिंग मशीन TBM मात्र चीनमधूनच आणावी लागते.

आपल्या उच्च अधिकाऱ्यांना चीनने जगभरातील बाजारपेठांचा आणि त्यांच्या गरजांचा अभ्यास करण्यासाठी पाठवले, त्याप्रमाणे विविध बाजारपेठांचा योग्य तो अभ्यास आणि अचूक अंदाज घेऊन वेगवेगळ्या उत्पादन रचना करणे ही चीनची सर्वात मोठी रणनीती ठरली आहे. युरोपसाठी हरित तंत्रज्ञान, आफ्रिकेसाठी स्वस्त व टिकाऊ उत्पादने, आशियासाठी मध्यम दरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, ज्यांना आपण स्वस्त चिनी उत्पादने म्हणतो अशी विभागनिहाय उत्पादन धोरणे चीनने यशस्वीपणे राबवली. त्यामुळे जागतिक मागणीत चढ-उतार असतानाही चीनची निर्यात सातत्याने वाढत राहिली जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांची उत्पादन क्षमता कमी झाली असताना चीनने मात्र पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवत संधीचे सोने केले.

एकूणच पाहता चीनचे वाढते निर्यात आधिक्य ही योगायोगाने घडलेली बाजारपेठीय घटना नसून ती धोरणात्मक नियोजन, युवा शक्तीचा प्रभावी वापर, संशोधनातील गुंतवणूक आणि जागतिक बाजारपेठेचा अचूक अभ्यास यांचा परिपाक आहे. जागतिक तणावाच्या काळातही आर्थिक आघाडीवर मिळवलेले यश अतुलनीय आहे. आज पण भारत-चीन व्यापारात चीन आघाडीवर असून 100 अब्ज डॉलरच्या फरकाने भारत मागे आहे. भारतासाठी यातून बोध म्हणजे प्रत्यक्ष परिणाम देणारे उद्योग धोरण मजबूत केले पाहिजे. खासगी भांडवलदारांना प्रेरणा देऊन त्यांना स्वस्त भांडवल, योग्य किमतीत जमिनीची उपलब्धता, वीज पुरवठा, निर्यातप्रधान उद्योगांना प्रोत्साहन, सुटसुटीत कर रचना, कामगार कायदे, उद्योजकांना निर्यातीसाठी इतर पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या आणि जागतिक स्तरावर स्पर्धक होण्याची तयारी, त्यासोबत जपान, कोरियाप्रमाणे उत्पादनाची नावीन्यता, सुबकता आणि जागतिक तोडीचा दर्जा यावर लक्ष देणे जरुरी आहे, तरच भारताची व्यापार तूट कमी होईल. नाहीतर चीनचे वर्चस्व पुढील अनेक दशके असेच टिकून राहील.