
>> साधना गोरे
डिसेंबर महिना आला की, साऱ्या जगाला नव्या वर्षाची चाहूल लागते, सगळे नव्या वर्षाची आतुरतेने वाट पाहू लागतात. डिसेंबर हा वर्षाचा बारावा म्हणजे शेवटचा महिना. गणितासारख्या विषयात संख्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतंच, पण काही संख्या आपल्या रोजच्या वापरात इतक्या रुजलेल्या असतात की, त्यांचं वेगळं अस्तित्व जाणवतही नाही. अशीच एक संख्या म्हणजे बारा. हिंदू धर्मात तर या संख्येभोवती कितीतरी अर्थांचे शब्दप्रयोग पिंगा घालताना दिसतात. संस्कृतमधील ‘द्वादस’ या संख्येत मराठी आणि बऱ्याच भारतीय भाषांतील ‘बारा’ या अंकाचं मूळ आहे, असं म्हटलं जातं. ‘द्वादस’ म्हणजे दोन आणि दहा. हा ‘द्वादस’ पुढे प्राकृतमध्ये दुवादस, द्वालस, बारस, बारह या क्रमाने विकास पावत मराठीत आला. कृ. पां. कुलकर्णी यांनी ‘व्युत्पत्ती कोशा’त वरीलप्रमाणे क्रम देऊन पुढे असंही म्हटलं आहे की, ‘प्राकृत ‘बारह’ हा संस्कृत ‘द्वादश’पासून निघणे जरा असंभवनीय आहे. एकारह, बारह, तेरह ही संख्या विशेषणे प्राकृतमध्ये स्वतंत्रच असावीत. नंतर त्यांचा संस्कृतशी संबंध जोडलेला दिसतो.’
आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ‘बारा’ या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व दिसतं. वर्षाचे महिने बारा आहेत, ज्योतिष शास्त्रातील राशी बारा आहेत, बारा ज्योतार्ंलगे आहेत. पांडवांचा वनवास, कुंभपर्व यांच्याशीही बारा संख्या संबंधित आहे. वर्षभरातील सूर्याच्या रूपांना उद्देशून ‘बारा आदित्य’ म्हटलं जातं. बारा स्वर विविध व्यंजनांमध्ये मिसळून तयार होणारी अक्षर मालिका म्हणजे ‘बाराखडी’. सर्व मोसमांत उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे बारमाही किंवा बारमासी. अतिशय खोटं बोलणारा मनुष्य – बारजिभ्या. बारा बंद असलेला अंगरखा – बाराबंदी. बारा बलुतेदार. जन्मापासून बाराव्या दिवशी करण्यात येणारा नामकरणाचा विधी – बारसे, मृत्यूनंतर बाराव्या दिवशी करण्यात येणारा विधी – बारावं. इतपंच काय, मानवाने दिवस आणि रात्रीचे विभाजनही बारा-बारा तासांत केलं आहे. आपल्या सामाजिक-सांस्कृतिक आचार विचारांमध्ये बाराचे असे कितीतरी समूह दिसून येतात.
वस्ताद, चवचाल मनुष्याला उद्देशून ‘बारा गावचं किंवा बारा बंदरांचं पाणी प्यालेला’ असं म्हटलं जातं. परस्परांशी कोणत्याही नात्याने संबंधित नसलेले, भिन्न भिन्न स्वभावाचे लोक एकत्र येतात तेव्हा ‘बारा गावचे बारा’ म्हणण्याची पद्धत आहे. अनेक मतांच्या, स्वभावांच्या लोकांनी मिळून केलेल्या कामाला ‘बारभाईंचा कारभार’ म्हटलं जातं. या शब्दप्रयोगाला एक ऐतिहासिक संदर्भही आहे. नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर त्यांचे पुत्र सवाई माधवराव हे पेशवे झाले. मात्र त्या वेळेस माधवराव अल्पवयीन असल्याने नाना फडणवीस, सखाराम बापू इ. बारा मुत्सद्दय़ांचे मंत्रिमंडळ सर्व कारभार पाही. कालांतराने या शब्दप्रयोगाला नकारात्मक अर्थ प्राप्त होत गेलेला दिसतो. ज्या कामात किंवा उद्योगात अनेकांचा सहभाग असतो आणि प्रत्येक जण केवळ हुकूम सोडत असतो, परंतु त्याची बजावणी मात्र कुणीच करत नाही, सगळा सावळा गोंधळ होतो, अशी नकारात्मक अर्थछटा सध्या या शब्दप्रयोगाला प्राप्त झालेली दिसते. यालाच जोडून ‘बारभाई कारस्थान’ असाही एक शब्दप्रयोग केला जातो. याचा अर्थ एकमताने वागणाऱया मंडळींनी केलेले कारस्थान. नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर राघोबादादांच्या विरुद्ध कारभारी मंडळींनी केलेल्या कटाचा संदर्भ या शब्दप्रयोगामागे आहे, हे वेगळं सांगायला नको.
एखादी व्यक्ती सतत अनेक प्रकारच्या कामांत गुंतलेली असेल तर तिला उद्देशून ‘बारा मांडवांचा वऱहाडी’ म्हटलं जातं. वयाच्या बाराव्या वर्षापासून पौगंडावस्था सुरू होते. शरीरात होणाऱया बदलांमुळे या वयातील मुलांमध्ये एक प्रकारचा मानसिक गोंधळ असतो. एखादी प्रौढ व्यक्ती जेव्हा या वयातल्या मुलाप्रमाणे वागते, तेव्हा तिला ‘बारावं सरलंय का, लागलंय का?’ अशी खोचक विचारणा केली जाते. तर एका ठिकाणी न राहता सतत भटकणाऱया मनुष्याला ‘बारा पिंपळावरचा मुंजा’ म्हटलं जातं. बाराव्या महिन्यानंतर वर्ष संपतं, बारा वाजल्यानंतर दिवसाचा किंवा रात्रीचा प्रहर संपून नव्या प्रहरास प्रारंभ होतो. यावरून ‘बारा वाजणे’ हा शब्दप्रयोग समाप्त होणं, नष्ट होणं या अर्थी रूढ झाला आणि पुढे तो उतरती कळा लागणे, नाश होणे, दिवाळे निघणे या अर्थीही वापरला जाऊ लागला. डिसेंबर सरता सरता या वर्षातल्या सगळ्या समस्याही सरोत, येत्या वर्षात त्याचे बारा वाजू देत, अशीच सर्वांची उत्कट इच्छा आहे. मराठीतील बारा अंकाचा इंग्रजीतील ‘डझन’ आणि ‘डिसेंबर’ या शब्दांशीही अतूट संबंध आहे. त्याविषयी पुढील लेखात पाहू.






























































