
प्रथमच राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करणाऱया प्रभादेवीच्या जयदत्त क्रीडा मंडळाने स्पर्धेनिमित्त क्रीडाप्रेमींना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक सत्राला स्ट्रायकर बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. येत्या 27 ते 29 डिसेंबरदरम्यान प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यातील जागतिक कीर्तीचे कॅरमपटूही खेळणार असल्यामुळे मोठय़ा संख्येने क्रीडाप्रेमींची उपस्थिती लाभावी यासाठी आयोजकांनी कंबर कसली आहे. तीन दिवस चालणाऱया या स्पर्धेत किमान 20 सत्र चालणार असून प्रत्येक सत्रात एका क्रीडाप्रेमीला मंडळाचा कार्यकर्ता विघ्नेश वराडकरने श्रीमती वराडकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट दर्जाचे स्ट्रायकर देण्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक सत्राला लकी ड्रॉ पद्धतीने क्रीडाप्रेमीला स्ट्रायकर दिले जाणार आहेत.





























































