सुट्टीच्या दिवशी बिअरचे पेग रिचवले तर काय बिघडलं? डकेटच्या पाठीशी वॉन खंबीरपणे उभा

अॅशेस मालिकेत इंग्लंड 0-3ने पिछाडीवर असताना मैदानावरील अपयशापेक्षा नोसा दौऱ्यातील कथित मद्यपानावरच जास्त चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने थेट आणि ठाम भूमिका घेत सुट्टीच्या दिवशी खेळाडूंनी बिअरचे पेग रिचवले तर काय बिघडले? टीका ही त्यांच्या निराशाजनक कामगिरीवर झाली पाहिजे, अशा शब्दांत खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत वादाला वेगळेच वळण दिले.

‘द टेलिग्राफ’मधील स्तंभात वॉनने बिनधास्त आपल्या खेळाडूंची बाजू घेतली. आपल्या कॉलममध्ये लिहिलं की, खेळाडूंची टीका त्यांच्या क्रिकेटवर व्हावी, सुट्टीच्या दिवशी त्यांनी काय केलं यावर नाही. दोन दिवसांच्या ब्रेकमध्ये काही तरुण खेळाडूंनी बिअरचे पेग रिचवले म्हणून त्यांना दोषी ठरवणं हास्यास्पद असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. ‘मीसुद्धा इंग्लंडसाठी खेळताना असेच केले आहे,’ अशी कबुली देत वॉनने क्रिकेटमधील तथाकथित ‘ड्रिंकिंग कल्चर’वर बोट ठेवले.

वॉनने बेन डकेटच्या बाजूने उभे राहत कोणतीही कारवाई नाकारली. उपलब्ध पुराव्यांवरून डकेट किंवा इतर कुणालाही फटकारण्याचा प्रश्नच येत नाही. हा प्रश्न एखाद्या खेळाडूचा नसून क्रिकेट संस्कृतीचा असल्याचे त्याने आपल्या लेखात मांडले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या चारही देशांमध्ये हीच संस्कृती आहे. तीन-चार दिवसांची सुट्टी दिल्यावर युवा खेळाडू असंच करणार, असा परखड युक्तिवाद त्याने केला.