हॅरिस शील्ड अंजुमन इस्लामकडेच

129 व्या हॅरिस शील्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंजुमन इस्लाम संघाने अपेक्षेप्रमाणे अल-बरकत इंग्लिश स्कूलचा 8 विकेटनी सहज पराभव केला आणि हॅरिस शील्डचे जेतेपद स्वतःकडेच राखले. बुधवारीच त्यांनी आपले जेतेपद निश्चित केले होते आणि आज त्याच्याव शिक्कामोर्तब केले.

आज केवळ चार षटकांसाठी मैदानात उतरलेल्या अल-बरकतने आपल्या धावसंख्येत 31 धावांची भर घातली. त्यामुळे त्यांनी 40 षटकांत 3 बाद 243 धावा केल्या. अरहान पटेलने नाबाद 105 धावांची शानदार खेळी साकारली तर प्रज्ञांकुर भालेराव 67 धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरादाखल वानखेडेवर उतरलेल्या अंजुमनने 111 धावांचे माफक लक्ष्य 19.5 षटकांत दोन विकेटच्या मोबदल्यातच गाठले आणि सलग दुसऱयांदा हॅरिस शील्ड आपल्या शाळेचे नाव कोरले. अंजुमनने पहिल्या डावात अल बरकतचा 135 धावांत खुर्दा पाडत सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. अंजुमनच्या लक्ष्मणप्रसाद विश्वकर्मा सर्वोत्तम फलंदाज ठरला तर ज्ञानदीप सेवा मंडळाचा गोलू पाल सर्वोत्तम गोलंदाज ठरला. अंजुमनच्या युवान शर्माने सर्वोत्तम अष्टपैलूचा मान मिळवला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा क्रिकेट दिग्गज दिलीप वेंगसरकर, करसन घावरी, एमसीएचे उन्मेष कुलकर्णी, शालेय क्रीडा संघटनेचे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांच्या उपस्थितीत पार पडला.