
नक्षल चळवळीला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ओडिशामध्ये कंधमालजवळ झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य गणेश उईके (69) याचा खात्मा करण्यात आला. त्याच्यावर 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस होते. या चकमकीत उईके, दोन महिला नक्षलवाद्यांसह एकूण 6 नक्षलवादी ठार झाले आहेत.
सुरक्षा दलांना कंधमाल जिह्यातील चाकापाड भागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार 23 पथकांना मोहिमेवर पाठविण्यात आले. कंधमाल आणि गंजम जिह्यांमध्ये विखुरलेल्या रांभा वन क्षेत्रात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक उडाली. चकमक थांबल्यानंतर जवानांनी परिसर पिंजून काढला. त्या वेळी 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर रायफली आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
कोण होता गणेश उईके?
गणेश उईके याचा जन्म तेलंगणातील नालगोंडज्ञ जिह्यात पुल्लेमला गावात झाला होता. तो गेल्या अनेक दशकांपासून ओडिशासह छत्तीसगडमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर ओडिशाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 7 राज्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर 1.10 कोटी रुपयांचे बक्षीस होते. तो आता मारला गेल्यामुळे ओडिशा तसेच जवळपासच्या क्षेत्रात माओवाद्यांचे नेतृत्व, नियंत्रण आणि समन्वय कमकुवत होईल, असे बस्तर रेजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितले.
या वर्षी या कुख्यात नक्षलवाद्यांचा झाला खात्मा
मडवी हिडमा – छत्तीसगड बसव राजू ऊर्फ गगन्ना – आंध्र प्रदेश
जयराम ऊर्फ चलपती – आंध्र प्रदेश
सुधाकर – तेलंगणा
भास्कर – आंध्र प्रदेश
रेणुका – तेलंगणा
गजरला रवी – तेलंगणा
राजे – छत्तीसगड
रूपेश – महाराष्ट्र
दसरू – ओडिशा
जोगन्ना – तेलंगणा



























































