रस्ते अपघातांत 11 महिन्यांत 14 हजार जणांचा मृत्यू

राज्यात या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर  या कालावधीत राज्यात एकूण 33 हजार 2 अपघात झाले असून, त्यामध्ये 14 हजार 66 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 32 हजार 784 अपघातांमध्ये 14 हजार 185 मृत्यू झाले होते. परिणामी राज्यात अपघातांची संख्या 218 ने (0.66 टक्के) वाढली असल्याची अधिकृत आकडेवारी पुढे आली आहे.

राज्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर बेदरकारपणे वाहने चालवण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. परिणामी रस्ते अपघात वाढत असल्याची परिवहन विभागाची आकडेवारी पुढे आली आहे.

या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यात 32 हजार अपघातांत 14 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 32 हजार 784 अपघातांत 14 हजार 185 मृत्यू झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या वाढली असली तरी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 119 ने म्हणजेच 0.83 टक्क्यांनी घटली आहे, असा दावा परिवहन विभागाने केला आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यूंमध्ये मोठी घट नोंदविण्यात आल्याचा दावा केला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत या मार्गावर 82 अपघाती मृत्यू झाले होते, तर 2025 मध्ये ही संख्या 61 वर आली आहे. म्हणजेच 21 मृत्यूंनी (26 टक्के) घट झाली आहे. तसेच अपघातांची संख्या 66 वरून 54 इतकी कमी झाली असून, त्यामध्ये 18 टक्के घट नोंदविण्यात आल्याचे परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिह्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येतही  विशेष घट दिसून आल्याचे नमूद केले आहे. नागपूर शहरात 21 टक्के, पालघरमध्ये 20 टक्के, अमरावतीत 17 टक्के, पुण्यात 15 टक्के, धुळय़ात 14 टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 टक्क्यांनी अपघाती मृत्यू कमी झाले आहेत, असे परिवहन विभागाने कळविले आहे.