तुमच्यासाठी उमेदवारी मागायला जनता यायला हवी, नगरसेवक बनायचे तर शिव्या खायची तयार ठेवा; काम करावे लागेल; भाजपमधील पालिका निवडणुकांसाठी इच्छुकांचे नितीन गडकरी यांनी टोचले कान

nitin-gadkari-delhi

नगरसेवक बनायचे तर शिव्या खायची तयार ठेवा; काम करावे लागेल. एका घरातील चौघांनी उमेदवारी मागितली. कुणाचा मुलगा-मुलगी होणे गुन्हा नाही. मात्र, तुमच्यासाठी उमेदवारी मागायला जनता यायला हवी. तुमचे वडील आई उमेदवारी मागायला येत असेल तर याला अर्थ नाही. मी एकही उमेदवारी ठरवायला येणार नाही, अशा शब्दात केंद्रीय नितीन गडकरी यांनी भाजपमधील पालिका निवडणुकांसाठी इच्छुकांचे कान टोचले.

पक्षाने शहरात चार सर्व्हे केले आहेत. एक मी केले आणि तीन देवेंद्र फडणवीस यांनी केले. या सर्व्हेमध्ये ज्यांना चांगले असेल तर उमेदवारी मिळेल. एकेका ठिकाणी पाच-पाच सक्षम उमेदवार आहेत. त्यांच्यात काहीही कमी नाही. त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची हा गंभीर प्रश्न आहे, असे गडकरी अटल संवाद सभेदरम्यान म्हणाले.

नगरसेवक बनायचे झाले तर आधी काम करा, अन्यथा तिकीट मागू नका. मला एका ठिकाणी समजले की नवरा, बायको, मुलगा आणि बहीण अशा चौघांनीही तिकीट मागितले होते. तेव्हा मी मस्करीत म्हणालो, अजून दोन जण उरलेत, ड्रायव्हर आणि चमच्यालाही तिकीट मागायचे राहिले की काय असा टोला गडकारींनी भाषणात लगावला.

कोणी कुठे जन्म घेतला, हा गुन्हा नाही. मात्र, स्वतःच्या पत्नीला तिकीट मिळावे म्हणून आग्रह धरण्यापेक्षा, लोकांनीच यांना तिकीट द्या असे सांगावे, अशी परिस्थिती निर्माण होणे अधिक योग्य आणि लोकशाहीला साजेसे असल्याचे ते म्हणाले.

चहा चिवडा खाऊन पक्ष चालवला

सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचे वातावरण सुरू असून इच्छुक उमेदवारांची गर्दी देखील वाढली आहे. यावर केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मिश्किल शैलीत वक्तव्य केले आहे. आजकाल पक्षांची आर्थिक स्थिती चांगली आहे. परंतु, आम्ही अनेक लोकांकडून चहा-चिवडा खाऊन पक्ष चालविल्याचे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी दादा कोंडके यांच्या चित्रपटाचा दाखला दिला. नितीन गडकरी म्हणाले, गर्दीतील प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपल्यालाच तिकीट मिळावे. मात्र जनता आता तितकीच हुशार झाली आहे. आजकाल पक्षाची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. परंतु आम्हीही अनेक लोकांकडून चहा-चिवडा खाल्ला आहे.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, एकदा मला एक व्यक्ती भेटली. त्याने चहा आणि जिलेबी खाऊ घातली, पण ‘माझे काय होणार?’ असा प्रश्न ती व्यक्ती विचारत होता. मी त्याला म्हणालो, तू खाऊ घाल, सर्व ठीक होईल. मात्र, त्यावेळी आमच्या हातात काहीच नव्हते. तरीही तिकीट देणारे आम्ही नाहीत, हे त्यांना माहीत नव्हते. आजही अनेक लोक ताणून बसले आहेत. लोकांना वाटते की नितीनजी किंवा देवेंद्रजी सांगतील तर तिकीट मिळेल, असे वाटणे स्वाभाविक आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.  

नागपूरमध्ये पाच हजार इच्छुक

केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असल्याने महापालिका निवडणुकीसाठी उमदेवारी मागण्यांची संख्याही मोठी आहे. नागपूरमध्ये जवळपास पाच हजार लोकांनी उमेदवारी मागितली आहे. अन्य शहरातही अशीच स्थिती असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

ही भूक कधीही न संपणारी

एक महिला माझ्याकडे आली आणि मला एकदा नगरसेवक बनवा अशी इच्छा व्यक्त केली. आम्ही तिला नगरसेवक बनवले. मात्र महापौर बनवू शकलो नाही. त्यामुळे ती खूप रडू लागली. तिचे रडणे पाहून माझ्या आईने विचारले, हिच्या नवऱयाचा मृत्यू झाला का? मी आईला सांगितले, नाही, हिला तिकीट मिळाले नाही म्हणून रडत आहे. नंतर तिला महापौर बनवले. त्यानंतर तिने आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आता ती नगरसेवकाच्या तिकिटासाठी तयार आहे, असे सांगत गडकरी म्हणाले की ही भूक कधीही न संपणारी आहे. महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांमध्ये आशा, अपेक्षा आणि आकांक्षा असणे चुकीचे नाही.