रशियाच्या रिफायनरीवर युक्रेन हल्ला, ब्रिटनच्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राचा केला वापर

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. रशियाच्या एका मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ब्रिटनच्या स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन सैन्यानुसार, हा हल्ला रशियाच्या रोस्तोव भागात असलेल्या नोवोशाख्तिंस्क तेल शुद्धीकरण प्रकल्पावर करण्यात आला.

गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशिया या दोघांनीही एकमेकांच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ले वाढवले आहेत. ऑगस्टपासून युक्रेनने रशियाच्या तेल रिफायनरीज आणि ऊर्जा पायाभूत सुविधांना अधिक लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून रशियाच्या तेलातून मिळणाऱ्या उत्पन्नाला नुकसान पोहोचवता येईल. युक्रेनच्या अधिकाऱयांनी सांगितले की, रिफायनरीमध्ये अनेक जोरदार स्फोट झाले.

  • गेल्या वर्षी ब्रिटनने युक्रेनला स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांचा वापर रशियाच्या आतही करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा या क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला होता.
  • युक्रेनने स्वतः तयार केलेल्या लांब पल्ल्याच्या ड्रोनने रशियाच्या ऊर्जा ठिकाणांनाही लक्ष्य केले आहे. या ड्रोन हल्ल्यांमध्ये क्रास्नोदार भागातील टेमरयुक बंदरातील तेलाच्या टाक्या आणि ओरेनबर्गमधील गॅस प्रोसेसिंग प्लांटवर हल्ला करण्यात आला.