डिलिव्हरी बॉईजचा ‘काम बंद’चा इशारा

ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या ‘गिग वर्कर्स’नी आता प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 31 डिसेंबर रोजी ‘गिग वर्कर्स’नी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. याचा परिणाम स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, फ्लिपकार्ट, अमेझॉन, झेप्टो आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या डिलिव्हरीवर होईल. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ अॅप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्सने या संपाची हाक दिली आहे. 25 डिसेंबर रोजी पुकारलेल्या संपाचा परिणाम अनेक शहरांतील ऑनलाईन सेवांवर झाल्याचे दिसून येत आहे.

10 मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलला तीव्र विरोध

वर्कर्सनी केंद्र आणि राज्य सरकारांना या प्लॅटफॉर्म कंपन्यांवर कडक नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः जीव धोक्यात घालून केली जाणारी ‘10 मिनिटांची डिलिव्हरी’ ही पद्धत त्वरित बंद करण्याची प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

‘गिग वर्कर्स’ म्हणजे काय?

ठरावीक वेतन देण्याऐवजी ‘काम तेवढा मोबदला’ या तत्त्वावर ज्या कर्मचाऱयांना कामावर ठेवले जाते, त्यांना गिग वर्कर म्हटले जाते. स्वतंत्र कंत्राटी कर्मचारी, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर्स – झोमॅटो, स्विगी, ओला, उबेर यांसारख्या अॅप्ससाठी काम करणारे, एजन्सीमार्फत नेमलेले कंत्राटी कर्मचारी तात्पुरते कर्मचारी.

प्रमुख मागण्या कोणत्या…

  • पारदर्शक वेतन ः कामासाठी न्याय्य आणि पारदर्शक वेतन संरचना लागू करावी.
  • आयडी ब्लॉकिंगवर बंदी ः कोणत्याही प्रक्रियेशिवाय आयडी ब्लॉक करणे आणि दंड आकारणे थांबवावे.
  • सुरक्षा साधने ः कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा गियर आणि उपाययोजना पुरवाव्यात.
  • भेदभावमुक्त काम ः अल्गोरिदमच्या आधारे कामाचे वाटप करताना भेदभाव न करता सर्वांना समान संधी द्यावी.
  • सामाजिक सुरक्षा ः आरोग्य विमा, अपघात विमा आणि पेन्शन यांसारख्या सामाजिक सुरक्षा कवच मिळावे.
  • कामाच्या तासांचे नियोजन ः कामाच्या दरम्यान विश्रांती आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करून घेऊ नये.