
जगातील पहिली वेबमेल सर्विस सुरू करणाऱया ‘हॉटमेल’चे सहसंस्थापक सबीर भाटिया यांनी नुकतेच एका पॉडकास्टमध्ये हिंदुस्थानातील शिक्षण प्रणालीबाबत महत्त्वाचे विधान केले. भाटिया म्हणाले की, आपण दुसऱ्याच्या विचाराने जगणाऱया समाजात राहतो. लोकांना अनेकदा सांगितले जाते की, दुसऱयांचे ऐका, ते सांगतील तेच करा. पण आधीच कोणीतरी गेलेल्या वाटेवर का चालावे? आपली शिक्षण प्रणाली ही व्यवस्थेला आव्हान देणारे द्रष्टे घडवण्याऐवजी आदेश स्वीकारणारे कामगार तयार करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. भाटिया पुढे म्हणाले की, अपयशाची भीती हीच देशात इनोव्हेशनला मागे खेचत आहे. जोपर्यंत हिंदुस्थानात डोळे झाकून आदेश पाळणे आणि खरी बुद्धिमत्ता यामध्ये गल्लत करणे थांबवणार नाही, तोपर्यंत तो प्रतिभावान लोक गमावत राहील.
































































