
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुका होत असल्याने यंदा इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बंडखोरीची भीती सर्वांनाच आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावांची घोषणा लांबवली जात असून शेवटच्या क्षणी ही नावे उघड केली जाणार आहेत.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी जेमतेम चार दिवस शिल्लक असले तरीही प्रमुख राजकीय पक्षांनी जागावाटपाच्या चर्चेच्या फेऱया सुरू ठेवून संभाव्य बंडखोरांना वेटिंगवर ठेवण्याची खेळी खेळली आहे.
भाजपसमोर आव्हान
महायुतीनेही शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार आणि जागावाटप गोपनीय ठेवण्याची भूमिका घेतली आहे. भाजप आणि शिंदे गटालाही मुंबईत संभाव्य बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. भाजपच्या उमेदवारांची यादी दिल्लीत अंतिम केली जाणार आहे. त्यामुळे यादी जाहीर होण्यास उशीर होणार आहे.
काँग्रेसची यादी दिल्लीतून
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी दिल्लीहून निश्चित होईल. मुंबईतील काही प्रभाग असे आहेत, जेथे काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाहीत. अशा प्रभागांत अन्य पक्षातील उमेदवारांना किंवा बंडखोरांना काँग्रेसच्या चिन्हावर उभे करण्याची रणनीती आहे.






























































